एकीकडे सर्वोच्च न्यायालयात शिंदे गटातील आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर सुनावणी चालू असताना दुसरीकडे राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण रंगताना पाहायला मिळत आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधकांनी राज्य सरकारच्या चहापानावर बहिष्कार घातला. तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केले. या आरोपांना आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला घेतलेल्या पत्रकार परिषदेत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केले. “देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांच्या अटकेची चर्चा चालू होती. मी तेव्हा तिथे उपस्थित होतो. तेव्हा मी काय म्हणालो, हे मी आत्ता सांगत नाही, नंतर सांगेन”, असं एकनाथ शिंदे पत्रकार परिषदेत म्हणाले होते. यावरून तर्क-वितर्कांना उधाण आलेलं असताना त्यावर संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे.
शिंदे गटानं शिवसेनेच्या सर्व ५५ आमदारांना बजावला व्हीप; ठाकरे गट काय भूमिका घेणार?
संजय राऊतांचं एकनाथ शिंदेंना प्रत्युत्तर!
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खोटं बोलत असल्याचं संजय राऊत यावेळी म्हणाले आहेत. “मुख्यमंत्री खोटं बोलत आहेत. ते गुवाहाटीला जाऊन आल्यापासून त्यांच्या तोंडाला जे रक्त लागलेलं आहे त्यामुळे ते खोटं बोलत आहेत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना सरकारचं धोरण हे होतं की कुणावरही राजकीय सूडापोटी कारवाया करायच्या नाहीत. ते धोरण आम्ही पाळलं. नाहीतर अत्यंत संथ गतीने अनेक तपास झाले नसते. तावून-सुलाखून काढलं नसतं”, असं संजय राऊत म्हणाले.
“मग तेव्हा एकनाथ शिंदे तोंड आवळून का बसले होते?”
“विक्रांत घोटाळा हा या महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा घोटाळा झाला. ठाकरे सरकारनं यावर काळजीपूर्वक तपास करायला सांगितलं. अटक करता आली असती. नव्या सरकारनं सत्तेवर येताच अनेक प्रकरणं दडपून टाकली. क्लीनचिट दिली. फडणवीस, महाजनांना अटक करण्यासंदर्भात असं कधी काय झालं होतं? याचा अर्थ सध्याचे मुख्यमंत्री त्या गुन्ह्यात सहभागी होते. मग तेव्हा ते तोंड आवळून का बसले होते? उद्धव ठाकरे अत्यंत संयमी आणि सुसंस्कृत मुख्यमंत्री होते. त्यानुसार ते काम करत होते”, असं संजय राऊत म्हणाले.
“..म्हणून मंत्रीमंडळ विस्तार होत नाही”
दरम्यान, भीतीपोटीच सरकारकडून मंत्रीमंडळ विस्तार केला जात नाही, असा आरोप संजय राऊतांनी केला आहे. “जे सरकार, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री मंत्रीमंडळाचा विस्तार करू शकले नाहीत, ते सरकार स्थिर किंवा वैध आहे हे कसं म्हणाल तुम्ही? त्यांच्या डोक्यावर आजही अपात्रतेची टांगती तलवार आहे. सर्व आमदार अपात्र ठरतील याची आम्हाला खात्री आहे. निवडणूक आयोगानं शेण खाल्लं हे बरोबर आहे. पण सर्वोच्च न्यायालय आमच्यासाठी आशेचा किरण आहे. या भीतीपोटीच मंत्रीमंडळ विस्तार होत नाहीये”, असा दावा संजय राऊतांनी केला आहे.