Premium

“विस्ताराचा पाळणा हलायला…”, ठाकरे गटाचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल; म्हणाले “सगळाच वांझ कारभार…”

राज्यात रखडलेल्या स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरूनही ठाकरे गटाने सत्ताधाऱ्यांना जाब विचारला आहे.

uddhav thackeray over cabinet expansion
मंत्रिमंडळ विस्तारावरून ठाकरे गटाची सडकून टीका (फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात मंत्रिमंडळ विस्ताचारी चर्चा सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्यानंतर या चर्चांना अधिक जोर आलाय. ठाकरे गटातील नेते मंत्रिमंडळ विस्तारावरून सत्ताधाऱ्यांवर टीका करत आहेत. तर, शिंदे गटातील अनेक नेत्यांना मंत्रिपदे न मिळाल्याने ते नाराज असल्याच्या चर्चा आहेत. परंतु, तरीही राज्य सरकारकडून मंत्रिमंडळ विस्तार केला जात नसल्याने ठाकरे गटाने हल्लाबोल केला. तसंच, राज्यात रखडलेल्या स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरूनही त्यांनी सत्ताधाऱ्यांना जाब विचारला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सरकारची अब्रू चव्हाट्यावर

मिंधे सरकारचा कारभार घोषणांमध्ये’गतिमान’ आणि प्रत्यक्ष कामात ‘गतिमंद’ असाच सुरू आहे . डबल इंजिनवाल्या सरकारची ही अधोगती आहे. सरकारची गती व मती हा अभ्यासाचा विषय आहे. या सरकारची अब्रू रोज चव्हाट्यार पडते आहे. तेव्हा कोणत्या गतीच्या गोष्टी करता? मुंबईसह सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, डॉ . बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठांचे कुलगुरू नेमायला एवढा उशीर केला. आता मुंबईसह महाराष्ट्रातील इतर महापालिकांना महापौर कधी मिळणार, या प्रश्नाचे उत्तर द्या!, असं ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या सामना अग्रलेखात म्हटलं आहे.

हेही वाचा >> विश्वासार्ह पर्याय दिला तरच लोकसभेत जनता वेगळा विचार करेल; शरद पवार यांचे मत

डबल इंजिन सरकारला तेलपाणी करण्यास दिल्ली सर्व्हिंसिंग स्टेशनला जावं लागतं

महाराष्ट्रात गतिमान सरकार आल्याची पुंगी मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस वाजवत असतात. आपले सरकार ‘डबल इंजिन’वाले आहे असे ते म्हणतात. पण इंजिनास ‘तेलपाणी’ करण्यासाठी त्यांना वारंवार दिल्लीच्या सर्व्हिसिंग स्टेशनला जावे लागते. यालाच जर हे लोक गतिमान सरकार म्हणत असतील तर काय बोलायचे? सत्य असे आहे की, तथाकथित गतिमान सरकारचा वेग बैलगाडीपेक्षा कमी आहे, अशीही टीका यातून करण्यात आली आहे.

नऊ महिने गेले तरी…

“वर्षभरापासून मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकलेला नाही आणि विस्तार व्हावा यासाठी मिंधे-फडणवीस दिल्लीस हेलपाटे मारून थकले आहेत. जे सरकार वर्षभर मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याची हिंमत दाखवू शकले नाही त्यांनी गतिमानतेच्या गोष्टी कराव्यात याचे आश्चर्य वाटते. मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी शपथ घेतल्यावर पहिला विस्तार करायला ४१ दिवस लागले व त्या विस्तारास नऊ महिने होऊन गेले तरी दुसऱ्या विस्ताराचा पाळणा हलायला तयार नाही. कारण सगळाच ‘वांझ’ कारभार सुरू आहे. पाळणा इकडे व दोरी हलवणारे दिल्लीत असे चित्र आहे”, अशी टीका ठाकरे गटाने केली.

हेही वाचा >> “शिंदे-फडणवीसांची युती फोडायची नाहीतर…”, भावाच्या पक्षप्रवेशानंतर शशिकांत शिंदेंचा इशारा

सरकारने मुंबईच्या महापौरपदाचा कोंबडा झाकला आहे

“डबल इंजिन’वाल्या सरकारची कमाल कशी ती पहा. गेल्या दोनेक वर्षांपासून महाराष्ट्राची राजधानी मुंबई नगरीस महापौर नाही. मुंबई नगरी महापौरविना उघडीबोडकी आहे. महापौर नाही, महापालिकेत लोकनियुक्त सरकार नाही. मंत्रालयातून त्यांना हवा तसा कारभार हाकला जात आहे. बरे, महापौर व निवडणुका का नाहीत? तर निवडणुका घेतल्या तर शिवसेनेचाच महापौर होईल या भयाने गतिमान सरकारने मुंबईच्या महापौरपदाचा कोंबडा झाकला आहे. भारतीय जनता पक्षाची बदके अधूनमधून आमचाच महापौर असे सांगत आहेत. त्यावर गतिमान मिंधे गट बोलायला तयार नाही”, असेही टीकास्त्र करण्यात आले आहे.

लेनदेनचा गतिमान कारभार

“भाजपचे वनमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या खात्यात अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप इतर कोणी नाही, तर भाजपच्याच चार आमदारांनी केला आहे. याआधीही मिंधे मंत्रिमंडळात लाखो रुपयांच्या बदल्यात वर्णी लावून देण्याच्या ‘तोतयेगिरी’चा पर्दाफाश भाजपच्याच एका आमदाराने केला होता. पुन्हा हा तोतया स्वतःला भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांचा पीए म्हणवून घेत होता. आता तो गजाआड असला तरी राज्यातील मिंधे-फडणवीस सरकारचा ‘लेनदेन’चा ‘गतिमान’ कारभार या प्रकरणातूनही समोर आला होताच. वास्तवात, मिंधे सरकारचा कारभार घोषणांमध्ये ‘गतिमान’ आणि प्रत्यक्ष कामात ‘गतिमंद’ असाच सुरू आहे”, असा हल्लाबोलही या अग्रलेखातून करण्यात आला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-06-2023 at 07:57 IST
Next Story
शिवरायांच्या गडकिल्ल्यांचे संवर्धन कधी करणार? छत्रपती संभाजी राजे यांचा राज्य सरकारला सवाल