Thackeray Sena Whip Sanjay Raut warning rebel MPs action: उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत बुधवारी पडलेली फूट हा सध्या महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातला चर्चेचा विषय ठरला आहे. एकीकडे ठाकरेंचे ६ खासदार फुटल्याचे दावे सर्वच ठिकाणी केले जात असताना दुसरीकडे त्यातही दोन खासदारांनी अद्याप लोकसभा अध्यक्षांना पाठवायच्या पत्रावर सह्याच केल्या नसल्याचा दावाही केला जात आहे. या पार्श्वभूमीवर नेमकी फूट पडली आहे की नाही? आणि पडली असल्यास किती खासदार फुटले? याबाबत मोठा संभ्रम निर्माण झालेला असतानाच आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी बंडखोर खासदारांना मोठा इशारा दिला आहे.
संजय राऊत व अरविंद सावंत यांनी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या संसदीय पक्षाच्या बैठकीआधी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना संजय राऊतांनी बंडखोरांवर तातडीने कारवाई करण्याचा इशारा दिला. “आम्ही सगळ्यांना व्हीप दिला आहे. आम्ही वाट पाहणार आणि त्यानंतर तातडीने कारवाई सुरू होणार”, असं संजय राऊत म्हणाले. त्यामुळे आता या खासदारांवर नेमकी काय कारवाई होणार? आणि कारवाई झाली तर ती खासदारांना लागू असेल का? असे प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत.
“शिवसेनेचा व्हीप प्रत्येकापर्यंत पोहोचलाय”
दरम्यान, ठाकरे गटाच्या सर्व खासदारांना व्हीप पोहोचल्याचा दावा संजय राऊतांनी यावेळी केला. “शिवसेनेचे लोकसभेतील गटनेते अरविंद सावंत यांनी व्हीप काढून आजची खासदारांची बैठक बोलावली आहे. जेव्हा व्हीप काढला जातो, तेव्हा त्या बैठकीचं गांभीर्य समजून घेतलं पाहिजे. हा पक्षादेश असतो. आज महत्त्वाच्या विषयांवर खासदारांशी चर्चा करणं आम्हाला आवश्यक वाटतंय. हा व्हीप प्रत्येकापर्यंत पोहोचलाय. त्यांच्या घरी गेला आहे. ईमेलवर, व्हॉट्सअॅपवर आणि प्रत्यक्ष फोन कॉलवरदेखील हा निरोप आम्ही दिला आहे”, असं ते म्हणाले.
“बाळासाहेब ठाकरे आम्हाला आदेश देऊन गेलेत की आता जर कुठला आमदार-खासदार फुटला, तर त्याला रस्त्यावर तुडवा. आता आम्ही त्या आदेशाचं पालन करणार आहोत.
संजय राऊत, प्रवक्ते, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
“पक्ष फोडून दाखवाच, मग तुम्हालाही तोडलं नाही तर…”
यावेळी संजय राऊतांनी एकनाथ शिंदे गटाला थेट इशारा दिला आहे. “या लोकांना वाटतं की एकदा त्यांनी पक्ष फोडला आहे. आता मी सांगतो की पक्ष फोडून दाखवा. जर तुम्हाला नाही तोडलं तर शिवसेना आपल्या बापाचं नाव सांगणार नाही आणि आमच्या बापाचं नाव बाळासाहेब ठाकरे आहे. इतके पैसे आलेत का तुमच्याकडे? ईडी-सीबीआयच्या धमक्या कुणाला दाखवताय? आम्ही याआधीही तुरुंगात जाऊन आलोय, पुन्हा जायलाही तयार आहोत. पण तुम्हाला धडा शिकवल्यानंतरच मी तुरुंगात जाईन. देशातल्या लोकशाहीशी, संविधानाशी तुम्ही खेळत आहात”, अशा शब्दांत त्यांनी शिंदे गटातील नेत्यांना इशारा दिला आहे.
