बुलढाणा: महापालिका मध्ये सत्तास्थापनेसाठी महायुती आणि महाविकास आघाडी मधील विविध राजकीय पक्ष एकत्र येत असले तरी मुंबईपूरते देखील उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र येणे अशक्य असल्याचे ठाम प्रतिपादन शिवसेना शिंदे गटाचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी केले आहे.

मुबंईपूरते देखील हे एकत्र येण्याची सूतराम शक्यता नसल्याचे सांगून त्यांनी ही शक्यता फेटाळून लावली. अचलपूर नगर पालिका सारख्या ठिकाणी भारतीय जनता पक्ष आणि खासदार ओवैसी यांच्या एमआयएम एकत्र येणे ही अभद्र युती असल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले. शिवसेना (शिंदे गट) आणि राज ठाकरे यांची महाराष्ट्र नाव निर्माण सेना एकत्र येण्यात काहीच गैर नसल्याचे ते म्हणाले.

आपल्या रोखठोक आणि बेधडक राजकीय विधानामुळे बुलढाणा जिल्ह्याच नव्हे तर राज्यात चर्चेत राहणारे आमदार गायकवाड यांनी आज दीर्घ कालावधी नंतर स्थानिय प्रसिद्धी माध्यम प्रतिनिधी सोबत आज शुक्रवारी संवाद साधला. यावेळी त्यांनी वरीलप्रमाणे प्रतिपादन करून रोखठोक भाषेत राजकारणावर भाष्य केले.

मुंबई व बृहनमुंबई क्षेत्रातील महापालिकामधील सत्ता स्थापनेचा तिढा गुंतागुंतीचा झाला आहे. महायुती, महा विकास आघाडी मधील घटक पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सोबत घेऊन तसेच फोडाफोडी करून सत्ता स्थापन करण्याच्या राजकीय हालचालीना कमालीचा वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर आमदार गायकवाड यांनी माध्यमाशी बोलतांना आपली मते व्यक्त केली. उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे हे नेते महापालिका मध्ये सत्ता स्थापने साठी केवळ मुंबई पुरते देखील एकत्र येण्याची शक्यता त्यांनी फेटाळून लावली.

आम्ही भाजपा सोबत युती म्हणून लढलो. त्यामुळे अशी तडजोड होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. अचलपूर पालिका मध्ये भाजपा व एमआयएम यांची युती अभद्र असल्याचे ते म्हणाले. मुळात निवडणूक प्रचारात आपण काय बोललो, भाजपाचे तत्वज्ञान याच्याशी हे विसंगत असल्याचे सांगून त्यांनी मित्र पक्षाची खिल्ली उडविली. आमच्या शिवसेनेची आणि मनसे मध्ये युती, तडजोड होणे यात काही चुकीचे नसल्याचे सांगून त्यांनी पक्षाच्या भूमिकेचे समर्थन केले.

मुळात शिवसेना, भाजप, मनसे हे हिंदुत्ववादी विचारसरणीचे पक्ष् आहेत. त्यामुळे समान विचारधारा असणारे पक्ष एकत्र येत असतील तर त्यात विसंगत, अयोग्य असे काहीच नाही. ठाकरे ब्रँड बद्धल विचारणा केली असता मुळात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे बंधू आत्ता एकत्र आले. त्याला खूप उशीर झाला. ते जर २००९ मध्येच एकत्र आले असते तर खूप फरक पडला असता असे ठाम मत आमदार गायकवाड यांनी मांडले.