रत्नागिरी : गर्भपातासाठी आवश्यक असणारे औषधांचे किट उपलब्ध करून देण्यासाठी एका गरोदर महिलेकडे ४,५०० रुपयांची लाच मागून ती स्वीकारणाऱ्या कामथे येथील उपजिल्हा रुग्णालयातील वर्ग-१ च्या महिला वैद्यकीय अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) बुधवारी रंगेहात पकडले. या कारवाईमुळे वैद्यकीय क्षेत्रासह शासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

या प्रकरणातील आरोपी डॉ. कांचन शिरीष मदार (वय ४८), या उपजिल्हा रुग्णालय, कामथे (ता. चिपळूण) येथे वैद्यकीय अधिकारी, वर्ग-१ म्हणून कार्यरत आहेत. त्या चिपळूण तालुक्यातील पागमळा परिसरातील रहिवासी आहेत.

एसीबीकडून मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला गरोदर असून त्यांना वैद्यकीय कारणास्तव गर्भपात करावयाचा होता. त्यासाठी त्यांनी मंगळवारी (३ जून) कामथे येथील उपजिल्हा रुग्णालयात जाऊन डॉ. मदार यांची भेट घेतली. यावेळी गर्भपातासाठी आवश्यक असणारे किट (गोळ्या) देण्यासाठी डॉ. मदार यांनी चार ते पाच हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचा आरोप आहे.

तक्रारदार महिलेला लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी तत्काळ रत्नागिरी येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. तक्रारीची दखल घेत एसीबीच्या पथकाने त्याच दिवशी पडताळणी केली. पडताळणीदरम्यान डॉ. मदार यांनी ४,५०० रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्याचे एसीबीने सांगितले.

यानंतर एसीबीच्या पथकाने सापळा रचला. तक्रारदार महिलेकडून ४,५०० रुपयांची लाचेची रक्कम स्वीकारण्यास डॉ. मदार यांनी होकार दिला. ठरल्याप्रमाणे त्यांनी ही रक्कम त्यांच्या खासगी चारचाकी वाहनात (एमएच ०८ एएक्स २६१८) स्वीकारली. लाचेची रक्कम स्वीकारताच दबा धरून बसलेल्या एसीबीच्या अधिकाऱ्यांनी पंचांसमक्ष कारवाई करत त्यांना रंगेहात ताब्यात घेतले. या प्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास एसीबीकडून करण्यात येत आहे.

ही कारवाई ठाणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक शिवराज पाटील, अपर पोलीस अधीक्षक भागवत सोनावणे आणि सुहास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. रत्नागिरी एसीबीचे पोलीस उपअधीक्षक अविनाश पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक सुहास रोकडे, मच्छिद्र जाधव यांच्यासह अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली.

नागरिकांना एसीबीचे आवाहन

दरम्यान, कोणत्याही शासकीय कार्यालयात कामाच्या मोबदल्यात लाचेची मागणी होत असल्यास नागरिकांनी तातडीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन एसीबी, रत्नागिरीतर्फे करण्यात आले आहे. यासाठी टोल फ्री क्रमांक १०६४ तसेच विभागाचे दूरध्वनी, मोबाईल आणि व्हॉट्सअॅप क्रमांक उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

एसीबीच्या म्हणण्यानुसार, नागरिकांनी वेळेवर तक्रार नोंदवल्यास अशा भ्रष्टाचाराच्या प्रकरणांवर प्रभावी कारवाई करणे शक्य होते.