ठाणे : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील येऊरमध्ये एका बेकायदा हाॅटेलवर ठाणे महापालिकेने कारवाई केली होती. या कारवाईला दोन आठवडे उलटल्यानंतरही महापालिकेकडून इतर हाॅटेलवर कारवाई झालेली नाही. त्यामुळे महापालिकेची कारवाई पक्षपाती वाटत असल्याचा गंभीर आरोप येऊर वन हक्क समितीने केला आहे.
काही दिवसांपूर्वी येऊर वन हक्क समितीने पत्रकार परिषद घेऊन येऊरमधील बेकायदा हॉटेल आणि इतर आस्थापनांवर कारवाई करण्याची विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केली होती. पत्रकार परिषदेनंतर दोनच दिवसांत ठाणे महापालिकेच्या वर्तकनगर प्रभाग समितीने येऊर येथील बाँबे डक या हाॅटेलवर कारवाई केली होती. हे हाॅटेल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या एका पदाधिकाऱ्याचे आहे. राजकीय सुडापोटी ही कारवाई केल्याचा आरोप ठाकरे गटाकडून केला जात होता. त्यामुळे वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले होते. परंतु इतर बेकायदा हाॅटेलवरही कारवाई केली जाईल, असा दावा महापालिकेने केला होता. दोन आठवडे उलटत असतानाही महापालिकेकडून कोणतीही कारवाई केली जात नसल्याने वन हक्क समितीने महापालिकेच्या कारभाराविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.
हेही वाचा – शेतकऱ्यांनी कष्टाने पिकविलेले धान्य चोरणारी टोळी अटकेत
हेही वाचा – कल्याणमध्ये तंत्रज्ञानाला कोंडून ठेवणाऱ्या डाॅक्टर विरुद्ध गुन्हा
येऊरमध्ये रात्रभर ध्वनीक्षेपक वाजवून पार्ट्या सुरूच आहेत. रात्री उशीरापर्यंत क्रिकेट प्रकाशझोतात क्रिकेट टर्फ सुरू असतात. विवाह समारंभही येऊरमध्ये पार पडत आहेत. रात्री उशिरा रस्त्यावर सतत मद्यधुंद पर्यटकांच्या उपस्थितीमुळे आदिवासी महिलांना असुरक्षित वाटत आहे. हॉटेल आता आपल्या दारात पोहोचली आहेत. विद्यार्थ्यांना परीक्षेचा अभ्यास करतानाही अडचणी येत आहेत, असा आरोप वन हक्क समितीने केला आहे. अनेक दिवस उलटून गेले तरी एक हॉटेल वगळता ठाणे महापालिकेकडून कोणतीही कारवाई झालेली नाही. महापालिकेची कारवाई पक्षपाती वाटत आहे. वनविभागाने येऊर प्रवेशद्वारावर केवळ दिखाव्यासाठी अडथळे बसविले आहेत. अनेक लोक रात्री ११ नंतर पार्टीसाठी येऊरमध्ये प्रवेश करतात, असा आरोपही त्यांनी केला आहे.