मुंबई : ठाण्यातील कोपरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत शिधावाटप भरारी पथक आणि पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत २० हजार लिटर डिझेल सदृश अवैध पेट्रोलियम पदार्थासह टँकर जप्त करण्यात आला. सुमारे ५३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी एकाला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिधावाटप विभागाच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार, गुरुवारी मध्यरात्री एक टँकर कोणत्याही वैध कागदपत्रांशिवाय मोठ्या प्रमाणात डिझेल सदृश पेट्रोलियम पदार्थाची बेकायदा वाहतूक करत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार उपनियंत्रक शिधावाटप आणि कोपरी पोलिसांनी संयुक्त कारवाई करून संबंधित टँकर अडविला. त्यामध्ये सुमारे २० हजार लिटर इतका बेकायदा पेट्रोलियम साठा आढळून आला. टँकरसह संपूर्ण साठा जप्त करण्यात आला. या बाबत एका व्यक्तीला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डोमिनोज पिझ्झा स्टोअरमधील गॅस सिलेंडर जप्त
नियंत्रक शिधावाटप कार्यालयाने ठाण्यातील वंडर मॉल परिसरातील डोमिनोज पिझ्झा स्टोअरवर धाड टाकून ४.५९ लाख रुपयांचा सिलेंडर साठा जप्त केला आहे. स्टोअरच्या तळघरात विविध तेल कंपन्यांचे गॅस सिलेंडर मोठ्या प्रमाणात साठवून ठेवलेले आढळले. एचपीसीएल, बीपीसीएल, आयओसी आणि गो गॅस कंपनीचे एकूण १४० सिलिंडर जप्त करण्यात आले. त्यापैकी ५५ सिलिंडर भरलेले तर ८५ सिलिंडर रिकामे होते. संबंधिताविरुद्ध जीवनावश्यक वस्तू कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
