राज्य सरकारने करोनाच्या पार्श्वभूमीवर मागील वर्षीप्रमाणे या वर्षीही गोपाळकाल्याच्या दिवशी दहीहंडी उत्सव साजरा करण्यावर बंदी घातली. मात्र दुसरीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने यंदा मोठ्या उत्साहात हा उत्सव साजरा करण्याची भूमिका घेत ठाण्यामधील भगवती मैदानामध्ये आज सकाळपासून आंदोलन सुरु केलं. मनसेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव आंदोलन केलं जात असतानाच ठाणे पोलिसांनी अविनाश जाधव आणि ठाणे शहरातील मनसे पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतलं आहे. अविनाश जाधव यांना ताब्यात घेण्यात आलं तेव्हा उद्धव ठाकरे हाय हाय अशी घोषणाबाजी करण्यात आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आम्हाला दहीहंडी उत्सव नियमांचं पालन करुन साजरा करु द्यावा अशी मनसेचे मागणी आहे. यासाठी आज सकाळपासूनच भगवती मैदानावर मनसेने तयारी सुरु केली. या मैदानामध्ये स्टेज उभारण्यात येत होता. मात्र सकाळपासूनच पोलिसांनी या ठिकाणी पोलीसबंदोबस्त तैनात केला. सव्वा अकराच्या सुमारास येथे पोलिसांच्या मोबाईल व्हॅन्स दाखल झाल्या आणि त्यानंतर जाधव यांच्यासहीत पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. यावेळी राज ठाकरेंचा विजय असो अशा घोषणा देण्यात आल्या तसेच उद्धव ठाकरेंविरोधातही घोषणाबाजी झाली.

नक्की वाचा >> सत्तेत आल्यापासून उद्धव ठाकरे हिंदू हा शब्दच विसरले आहेत; दहीहंडीवरुन मनसेचा टोला

शिवसेनेची गर्दी चालते मग सणांना विरोध का?

जुहूमधील नारायण राणेंच्या घरासमोर शेकडो शिवसैनिक जमले ते चालतं. यांचा (मुख्यमंत्र्यांचा) भाचा शेकडो लोकांना घेऊन आंदोलन करतो ते चालतं. काल नारायण राणे कुडाळमध्ये पोहचले तेव्हा शिवसेनेच्या शाखेसमोर शे-दीडशे लोक होते ते चालतं. मात्र हिंदूंचे सण म्हटल्यावर करोनाचं कारण दिलं जातं. याचं राजकारण करताना करोना आडवा येत नाही. असा कोणता करोना आहे जो उद्धव ठाकरेंच्या लोकांना होत नाही पण हिंदू सणांमध्ये पसरतो?, असा प्रश्न प्रसारमाध्यमांशी बोलताना जाधव यांनी उपस्थित केलाय. राज्य सरकारच्या निर्णयानंतर ठाण्यातील शिवसेनेच्या नेत्यांमार्फत आयोजित केले जाणारे दहीहंडी उत्सव रद्द करण्यात आले. मात्र, मनसेने दहीहंडी उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला असून नियम पाळून हा उत्सव साजरा करणार असल्याचा दावा केला आहे.

पाच हजार जमतात तिथे ५० जणांनाही बंदी घालत असाल तर…

पोलीस त्यांचं काम करत असून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची खबरदारी घेत असल्याचंही जाधव यांनी म्हटलं आहे. मात्र त्याचवेळी दहीहंडी साजरी करण्यासंदर्भात आपण ठाम असल्याचं ते म्हणाले आहेत. या मैदानात एका वेळी पाच हजार लोक जमतात. इथे जर तुम्ही ५० लोकांनाही जमा होण्यास बंदी घालत असाल तर हे चुकीचं आहे, असंही जाधव यांनी म्हटलं आहे. राज्य सरकारच्या आदेशांची अंमलबजावणी करत दहीहंडी उत्सवादरम्यान नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. त्यामुळे यंदाच्या दहीहंडी उत्सवादरम्यान ठाण्यात आयोजक विरुद्ध पोलीस असा संघर्ष वाजण्याची चिन्हे आहेत.

नक्की वाचा >> असा कोणता करोना आहे जो उद्धव ठाकरेंच्या लोकांना होत नाही पण हिंदू सणांमध्ये पसरतो?; मनसेचा सवाल

उद्धव ठाकरे हिंदू शब्दच विसरलेत

पोलिसांनी ताब्यात घेण्यापूर्वी जाधव यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. आपण माननीय बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र आहात हे लक्षात ठेवावं, असा उल्लेख करत जाधव यांनी मुख्यमंत्र्यांनी दहीहंडीसंदर्भात घेतलेल्या भूमिकेवरुन सुनावलं आहे. सत्तेत आल्यापासून उद्धव ठाकरे हिंदू हा शब्दच विसरले आहेत, अशी टीका जाधव यांनी केली आहे. आता भाजपा सत्तेत असती तर उद्धव ठाकरेंनीच हिंदू हिंदू केलं असतं. मात्र सत्तेत आल्यापासून ते हिंदू शब्दच विसल्याचा टोला जाधव यांनी लगावला आहे. दरवर्षी भगवती शाळेजवळच्या मैदानामध्ये मनसेकडून दहीहंडीचं आयोजन केलं जातं. करोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर यंदाही राज्य सरकारने दहीहंडी साजरी करण्यावर बंदी घातल्याने मनसेने नाराजी व्यक्त करत दहीहंडी होणारच असा पवित्रा घेतलाय. शिवसेनेला राजकारण करताना करोना आडवा येत नाही मात्र हिंदूंचे सण साजरे करताना करोनाचा प्रादुर्भाव होतो का असा प्रश्न जाधव यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना उपस्थित केलाय.

तिसऱ्या लाटेच्या भीतीने बंदी

ठाणे हे दहीहंडी उत्सवाचे ठाणे म्हणून ओळखले जाते. येथे विविध सामाजिक, सांस्कृतिक मंडळांखेरीज राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून मोठय़ा प्रमाणात दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले जाते. तसेच येथे बक्षिसांची लयलूटही मोठय़ा प्रमाणावर होते. त्यामुळे ठाणे जिल्हाच नव्हे तर मुंबई, पालघर, रायगड जिल्ह्यातील गोविंदा पथके गोपाळकाल्याच्या दिवशी ठाण्यात फिरताना दिसतात. मात्र, करोनाच्या संकटामुळे गेल्या वर्षी दहीहंडी उत्सव रद्द करण्यात आला. यंदाही करोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता विचारात घेऊन राज्य सरकारने दहीहंडी उत्सवाच्या आयोजनास परवानगी नाकारली आहे.

करोना फैलावाची शक्यता…

दहीहंडी फोडण्यासाठी मानवी मनोरे उभारले जातात. या थरांमधील व्यक्ती एकमेकांना चिकटून उभ्या असतात आणि त्यांना मुखपट्टी घालून थर उभारणे शक्य नाही. यामुळे नियमाच्या चौकटीत राहून हा उत्सव कसा साजरा होणार, असा सवाल आता उपस्थित होत आहे. करोना प्रतिबंधक लशीच्या दोन मात्रा घेतलेल्या व्यक्तींनाच दहीहंडी उत्सव साजरा करण्याची परवानगी देण्याची मागणी होत आहे. परंतु दहीहंडी उत्सवात तिसऱ्या थराच्या वरती १८ वर्षांच्या आतील मुलांचे थर रचले जातात. सद्य:स्थितीत या वयोगटाचे लसीकरण झालेले नाही. यातून करोनाचा फैलाव होण्याची भीती व्यक्त होत आहे.

गोविंदा पथकांचा प्रतिसाद

राज्य सरकारच्या आदेशांची अंमलबजावणी करण्यासाठी ठाणे पोलिसांनीही मागील आठवड्यापासूनच खबरदारी घेत विविध पोलीस ठाण्यांमध्ये गोविंदा पथकांच्या प्रतिनिधींच्या बैठका घेण्यास सुरुवात केली. त्यास गोविंदा पथकांचाही चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. तसेच आयोजकांनाही दहीहंडीची परवानगी नसल्याने त्यांनाही नियमांचे उल्लंघन टाळण्याचे आवाहन केले जात आहे. मात्र, त्यानंतरही नियमांचे उल्लंघन झाल्यास अशा आयोजकांविरोधात गुन्हा दाखल करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thane police taken action against mns leader avinash jadhav for protesting to have dahihandi festival in corona time scsg
First published on: 30-08-2021 at 12:15 IST