लसीकरण प्रक्रियेत अधिक सुसूत्रता आणण्यासाठी ठाणे जिल्ह्यात कलर कोड कुपन सिस्टम अंमलात आणणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे आता ठाणेकरांचे लसीकरण ‘कलर कोड कुपन सिस्टम’नुसार होणार असल्याचं दिसत आहे.

राज्यभरात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाच लसीकरण देखील मोठ्या प्रमाणात होत आहे, परंतु लसीचा कमी प्रमाणात असणारा पुरवठा यामुळे लसीकरणात खंड पडत आहे. ठाणे शहरात देखील अशीच परिस्थिती ही उद्भवलेली आहे. सुरुवातीच्या काळात फ्रंटलाइन वर्कर आणि वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना लसीकरण देण्यात आले होते त्यावेळी लसीचा पुरवठा हा सुरळीत होत होता. परंतु त्यानंतर ४५ वर्षावरील नागरिकांचे लसीकरण सुरू झाल्यानंतर लसीचा पुरवठा हा अपुरा असल्याने व लोकांची मागणी वाढत असल्याने लसीकरणामध्ये खंड पडू लागला आहे.

तर, लसीकरण सुरळीत करण्यासाठी कुपन सुविधा देखील सुरू केली, परंतु कुपन सुविधा सुरू केल्यानंतर नागरिक कुपन घेण्यासाठी गर्दी करू लागले. प्रशासनाने गर्दी न करण्याचे आवाहन करून देखील नागरिक लस घेण्यासाठी रात्रीपासूनच रांगेत उभे राहून गर्दी करू लागले. परंतु या सर्व घटना पाहता आता राज्यात १८ ते ४५ वयोगट व ४५ वर्षाहून अधिक वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरू आहे. या सर्व लसीकरण प्रक्रियेत अधिक सुसूत्रता आणण्यासाठी ठाणे जिल्हा चिकिस्तक कैलास पवार यांनी नवीन शक्कल लढवून कलर कोड कुपन सिस्टम अंमलात आणणार असल्याचे सांगितले आहे.

कशी असणार कलर कोड कुपन सिस्टम? –
राज्याप्रमाणे ठाणे शहरात देखील १८ ते ४५ वयोगटातील व ४५ वर्षावरील वयोगटात लसीकरण सुरू आहे. परंतु सध्या सुरू असलेल्या कुपन सिस्टममुळे अधिकच गोंधळ उडत आहे. नागरिकांनी घेतलेले कुपन हे दुसऱ्या दिवशी देखील लसीकरणासाठी वापरात आणले जात आहे असे निदर्शनास आले आहे. म्हणून वयोगटानुसार उपलब्ध असलेल्या लसींचा साठा बघून पिवळा, हिरवा, केशरी, गुलाबी, पांढरा, आणि निळा अशा सहा रंगाचे कुपन देण्यात येणार आहेत. दर दिवशी हे कुपन वयोगटानुसार बदलून देणार आहे. जेणेकरून आज घेतलेले कुपन हे दुसऱ्या दिवशी च्या वयोगटाला साम्य होणार नाही आणि लसीकरणासाठी सुसूत्रता देखील निर्माण होईल व नागरिकांची गर्दी देखील कमी होईल असे जिल्हा चिकिस्तक कैलास पवार यांनी सांगितलं आहे.