नाशिकमधल्या टीसीएस या कंपनीच्या बीपीओमध्ये धर्मांतरण आणि लैंगिक शोषण होत असल्याची घटना समोर आली. ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. दरम्यान या प्रकरणात ९ आरोपींना अटक करण्यात आली आहे. आता या कंपनीत काम करणाऱ्या महिलेने जिवंत असल्याबाबत देवाचे आभार मानले आहेत. तसंच ऑफिसमध्ये काय प्रकार चालत होते त्याबाबत सविस्तर भाष्य केलं आहे. ही महिला सहा वर्षे टीसीएसच्या बीपीओमध्ये काम करत होती.

टीसीएसमध्ये सहा वर्षे काम केलेल्या या महिलेने काय सांगितलं?

मी टीसीएसमध्ये काम करत होते, त्यावेळी माझी बदली नाशिकला झाली.त्या ठिकाणी असलेली जी इमारत होती त्या इमारतीच्या गच्चीवर मला एकटीला काम करण्यास सांगण्यात आलं. माझा फोन कायम तपासला जात होता. तसंच मी प्रसाधनगृहात जाण्यासाठी गच्चीवरुन खाली आले किंवा इतर कुठल्याही कारणाने खाली आले तरीही माझी बॅग, मोबाइल आणि इतर वस्तू सुरक्षा रक्षक त्यांच्याकडे घेऊन ठेवत होते. मी पाहात होते की महिला कर्मचाऱ्यांचं पद्धतशीरपणे ब्रेनवॉश करुन त्यांचं शोषण केलं जात होतं, त्याचप्रमाणे धर्मांतरणासाठी भाग पाडलं गेलं.

Nashik TCS Case News
टीसीएस कंपनीत धर्मांतरण आणि लैंगिक शोषण (फोटो-सोशल मीडिया)

२० ते २५ वर्षांच्या महिला किंवा मुलींना केलं जात होतं टार्गेट

या महिलेने पुढे असंही सांगितलं की साधारण २० ते २५ वर्षे या वयाच्या महिला कर्मचाऱ्यांना सॉफ्ट टार्गेट केलं जात होतं. अशा महिलांना किंवा मुलींना धर्मांतरणाच्या जाळ्यात ओढणं सोपं होतं असं ते करणाऱ्या पुरुष कर्मचाऱ्यांना वाटत होतं. कंपनीत असं काही होत असेल तर तुम्ही एचआरकडे जाता, पण इथली एचआरही त्यात सामील होती. मी तर देवाचे आभार मानते की सहा वर्षे काम करुनही मी जिवंत आहे असं या महिलेने सांगितलं. या महिलेने एनडीटीव्हीशी व्हिडीओ कॉलवर संवाद साधला. त्यामध्ये ही संपूर्ण माहिती या महिलेने दिली. मी टेरेसवर बसत होते, त्यामुळे मी जाळ्यात ओढले गेले नाही. कदाचित मी खाली बसले असते तर माझंही शोषण झालं होतं अशी भीती या महिलेने व्यक्त केली. नाशिकमधला शोषण आणि धर्मांतरणाचा प्रकार समोर आल्यानंतर माझ्या कुटुंबालाही धक्का बसला. आता माझ्या सुरक्षेबाबतही त्यांना काळजी वाटते आहे असं तिने सांगितलं. दरम्यान मी महिलांना एक व्हा आणि जे काही घडतंय त्या विरोधात आवाज उठवा असंही सांगितलं होतं. जेव्हापासून हे प्रकरण बाहेर आलं आहे तेव्हापासून टीसीएसच्या नाशिकमधल्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम दिलं गेलं आहे अशीही माहिती या महिलेने दिली.

ऑफिसची वेळ संपल्यावरही महिलांना थांबवलं जात होतं

महिला कर्मचाऱ्यांना नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि त्यांच्यावर दबाव आणण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी कंपनीत केल्या जात होत्या. ऑफिसची वेळ संपल्यानंतरही काही महिला कर्मचाऱ्यांना थांबवून घेतलं जात होतं. वरकरणी सगळे असं दाखवत होते की ऑफिसचं काम चाललं आहे. पण हे सगळेच जण म्हणजेच पुरुष कर्मचारी आणि त्यांच्यासह थांबलेल्या मुली आणि महिला हे संशयास्पद वर्तन करत होते. व्हॉट्स अॅप ग्रुपवर विशिष्ट संदेश पोस्ट केले जात होते. महिला कर्मचाऱ्यांचं मानसिक खच्चीकरण कसं गेलं जाईल ते पद्धतशीरपणे पाहिलं गेलं असंही या महिलेने सांगितलं आहे.

आणखी एका कर्मचाऱ्याने काय सांगितलं?

या सगळ्या धक्कादायक रॅकेटबाबत आणखी एका कर्मचाऱ्याने एनडीटीव्हीला ही माहिती दिली की धर्मांतरासाठी हिंदू मुलींना टार्गेट केलं जात होतं. हिंदू मुलींशी प्रेमाचे संबंध निर्माण करा आणि त्यांच्याशी लग्न करा. तसंच हिंदू मुलींना धर्म बदलायला लावा असंही सांगितलं जात होतं. या सगळ्यामध्ये एचआरही सहभागी होती. २०२१ पासून हे सगळं कंपनीत घडत होतं असंही या कर्मचाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितलं.

Nashik TCS Case
नाशिकच्या टीसीएस धर्मांतरण प्रकरणात एचआर निदा खानला अटक करण्यात आली आहे.

पीडित महिलांनी काय आरोप केले आहेत?

१) आमच्यासह कंपनीत छेडछाड केली जायची, याबाबत एचआरला कल्पना दिली पण त्या विभागाने काहीही केलं नाही.

२) आमच्या शरीरावर, रंगावर विचित्र पद्धतीने भाष्य करण्यात आलं होतं. अश्लील टिप्पणी करण्यात आल्या.

३) आरोपींनी एका पुरुषाला जबरदस्तीने नमाज पठण करायला लावलं होतं.

४) ऑफिसमध्ये हिंदू देवदेवतांचा अपमान केला जात होता. धर्माचाही अपमान केला जात होता.

एचआर निदा खानवर धर्मांतरणासाठी प्रवृत्त केल्याचा आरोप

तपासकर्ते आणि पीडित महिलांनी दिलेल्या माहितीनुसार निदा खान फक्त तक्रारींकडे दुर्लक्ष करत नव्हती. तर ती महिला कर्मचाऱ्यांशी दोस्ती करायची, त्यांना नमाज पठण कसं योग्य आहे ते सांगायची. तसंच हिजाब घालणं, मुस्लिम धर्मातल्या धार्मिक प्रथा कशा चांगल्या आहेत हे ठसवत होती. पीडितांचं हे म्हणणं आहे की निदा खानला ऑफिसमध्ये होत असणाऱ्या लैंगिक छळाबाबत आम्ही एकूण ७८ इमेल केले होते. त्यापैकी तिने कशाचीही दखल घेतली नाही. तक्रार करणाऱ्यांपैकी एका महिलेला उच्च अधिकाऱ्यांच्या संपर्कात येऊ दिलं नाही. त्यांना तसा सल्लाही दिला नाही. या सगळ्या गोष्टी समोर आल्या असताना आता टीसीएसमध्ये काम करणाऱ्या महिलेनेच शोषण आणि धर्मांतरण कसं चालत होतं ते सांगितलं आहे.