भारतीय जनता पार्टीची सत्ता असलेल्या चंद्रपूर महानगरपालिकेच्या इमारतीसमोर व शहरात सर्वत्र झळकलेल्या “थँक्यू मोदी सरकार”… च्या उपहासात्मक फलकांनी सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. चंद्रपूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने हे फलक सर्वत्र लावण्यात आले आहेत. पेट्रोलची शंभरी, खड्ड्यात गेलेला शेअर बाजार, बेरोजगारी व आकाशाला भिडलेल्या महागाईचा उल्लेख या फलकात केलेला आहे.

केंद्रातील मोदी सरकार टीकेच्या केंद्रस्थानी आहे. त्याला कारण मागील सहा वर्षात महागाईचा भडका उडला आहे. आज एक लिटर पेट्रोलसाठी १०० रूपये मोजावे लागत आहे. तर, डिझेल ९० रूपये लिटरपर्यंत पोहचले आहे. त्याचा थेट परिणाम दळणवळणावर झाल्याने भाजीपाला, गहू, तांदूळ, चणा व तुरीची दाळ, खाद्य तेल या जीवनावश्यक वस्तुंच्या किंमतीत भरमसाठ वाढ झाल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे, आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्य तेल तथा पेट्रोलच्या किंमती कमी असतांना भारतात पेट्रोल, डिझल व खाद्य तेल सर्वाधिक महाग झाल्याचे दिसत आहे. याचा परिणाम शेअर बाजारावर झाल्याचे दिसून येत आहे.

अनधिकृत होर्डिंग्स काढले जाणार –
शहराचे विद्रुपीकरण करणाऱ्या सर्व अनधिकृत होर्डिंग्सवर १०० टक्के कारवाई होणार असून, मनपातर्फे यास सुरूवात झालेली आहे. काही ठिकाणी उंचावर असलेल्या तसेच मजबूत ढाचा असलेले जाहिरात फलक काढण्यास एजन्सीची नियुक्ती करणार असल्याचे महापौर राखी कंचर्लावार यांनी महापालिकेच्या बैठकीत सांगितले.