यंदा इथेनॉलचे उत्पादन तिप्पट?

पावसाचा जोर आणि ऊस लागवडीचा परिणाम

पावसाचा जोर आणि ऊस लागवडीचा परिणाम

सुहास सरदेशमुख, लोकसत्ता
औरंगाबाद: राज्यात पावसाचा वाढलेला जोर आणि ऊस लागवडीचा वाढलेला अंदाज लक्षात घेता येत्या हंगामात तीन पटीने इथेनॉल उत्पादन वाढेल असा अंदाज आहे. गेल्या हंगामात ५०. ७३ लाख कोटीचे इथेनॉल उत्पादन झाले. तेही उद्दिष्टापेक्षा ३७ कोटी लिटरने कमी होते. इंधनात इथेनॉलचा वापर लक्षात घेता इथेनॉल उत्पादनला चालना देण्याचे केंद्र सरकारने ठरविले आहे. मात्र, बँकांकडून पुरेशा प्रमाणात कर्ज उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी गेली वर्षभर होत्या. या वर्षी मात्र त्यात मोठी वाढ होईल असा अंदाज व्यक्त होत आहे. गेल्या हंगामातील मळीपासून येत्या काळात ९० लाख कोटीपर्यंतचे उद्दिष्ट पूर्ण होईल, असे राष्ट्रीय साखर महासंघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांनी सांगितले. पुढील हंगामात ११७.८० लाख कोटी इथेनॉल निर्मिती केली जाणार आहे.

थेट उसाच्या रसापासून इथेनॉल उत्पादनात या वर्षी दुपट्टीने वाढ करता येईल असे नियोजन केले जात असून गेल्या वर्षी १४. ९४ लाख कोटी लिटर उद्दिष्टापैकी ८.३६ लाख कोटी इथेनॉल उत्पादित झाले होते. पण मळीपासून आणि ज्यात अधिक शर्करांश आहे अश बी हेव्ही मळीपासून ६४.४८ लाख कोटी लिटर पैकी ३५.९४ लाख कोटी लिटर इथेनॉल उत्पादन झाले. तसेच कमी शर्करांश असलेल्या ‘क‘ प्रकारच्या मळीपासून ५.८२ लाख कोटी इथेनॉल तयार झाले. अन्न पदार्थापासूनही इथेनॉल उत्पादन करण्यासाठी उत्पादन करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. अतिरिक्त तांदळापासून इथेनॉल निर्मिती करण्याची परवानी देण्यात आली होती. मात्र, तसा कारखाना राज्यात नाही. त्यामुळे गेल्या वर्षी ऊस आणि साखरेऐवजी इतर अन्न पदार्थापासून इथेनॉल तयार होऊ शकले नाही. पण या वर्षी तीन पट अधिक इथेनॉल निर्मिती होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.  गेल्या वर्षी इथेनॉल निर्मितीसाठी अनेक कारखान्यांनी बँकाकडे कर्जमागणी अर्ज केले होते. पण साखरेचा घसरता दर,  बॅकेच्या अंदाजपत्रकावरील उणे पत यामुळे अनेक कारखान्यांना कर्ज मिळाले नाही. परिणामी इथेनॉल निर्मितीचे उद्दिष्ट पूर्ण झाले नाही.

इथेनॉल उत्पादन आणि वापर

– उसाचे अंदाजित गाळप  – ११८० लाख मेट्रिक टन गाळपापैकी रसमिश्रित सिरप, साखर यापासून इथेनॉल उत्पादन- ४१.५० लाख मेट्रिक टन

ब) बी हेवी मळीचे उत्पादन (८० टक्के)- ९४० लाख मेट्रिक टन

क) सी हेवी मळीचे उत्पादन (१६.५ टक्के)- १९४.५०  लाख मेट्रिक टन

मळीचे उत्पादन

अ) बी हेवी मळी ६.५० टक्केप्रमाणे  (लाख मेट्रिक टन)- ६१.३६

ब) सी हेवी मळी ४.५० टक्केप्रमाणे (लाख मेट्रिक टन)- ८.७५

मळीचा वापर

१) मद्यार्क निर्मिती- २२.५० कोटी लिटर

२) रासायनिक प्रकल्पांना

लागणारी मळी- (ही मळी आयात करावी लागते)

३) इतर उत्पादनांसाठी व औषधे व प्रसाधनांच्या वापरासाठी सात कोटी लिटर

४) इथेनॉल उत्पादनासाठी मळीचा वापर- (४४.७५ बी हेवी) (४.२५ सी हेवी)

५) इथेनॉल उत्पादनासाठी लागणारी मळी- ४९ लाख मेट्रिक टन

इथेनॉल उत्पादन

१) उसाच्या रसापासून- २८ कोटी लिटर

२) बी हेवी मळीपासून- १३८.७५ कोटी लिटर

३) सी हेवी मळीपासून- ११.५ कोटी लिटर

एकूण १७७.८० कोटी लिटर

गेल्या वर्षी इथेनॉल निर्मितीची राज्याची क्षमता २०५ लाख कोटी लिटरची होती. पुढील वर्षी २२ सहकारी आणि ११ खासगी साखर कारखाने इथेनॉल निर्मितीमध्ये उतरणार आहेत. त्यामुळे पुढील वर्षभरात हे उत्पादन तिपटीने वाढू शकेल असा अंदाज आहे. गेल्या वर्षीही उत्पादन वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. पण कर्ज मिळण्यात काही कारखान्यांना अडचणी निर्माण झाल्या. या वर्षी ऊसही अधिक आहे आणि पाऊस चांगला होत असल्याने इथेनॉल उत्पादन वाढू शकेल.

जयप्रकाश दांडेगावकर, अध्यक्ष राष्ट्रीय साखर महासंघ

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Thanol production tripled this year due to heavy rain and sugarcane cultivation zws