अनुभव नसताना इंडिका चालवण्याचा प्रयत्न दोन लहान मुलांच्या जीवावर बेतला. मात्र, या अपघातात बचावलेल्या व या प्रकाराने आलेल्या नराश्यापोटी ‘त्या’ इंडिकाचा चालक बालाजी गुद्धे (वय २८) याने गुरुवारी रेल्वेखाली उडी मारून आपली जीवनयात्रा संपवली. सकाळी हा प्रकार घडला.
लोहा तालुक्यातील आष्टूरचे उपसरपंच यशवंत गुद्धे यांच्याकडे पुण्याहून लक्ष्मण मेहत्रे इंडिका घेऊन आले होते. इंडिका चालवण्याचा मोह त्यांचा भाऊ बालाजी गुद्धे याला आवरता आला नाही. मात्र, अनुभव नसताना गाडी चालवण्याचा त्याचा प्रयत्न दोन बालकांच्या जिवावर बेतला. इंडिका मोटार गावातील आडात २० ते २५ फूट कोसळली. यात सुमित व प्रतीक गुद्धे या दोघा मुलांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य तिघे गंभीर जखमी झाले. चालक बालाजी हाही जखमी झाला. मात्र, आपल्या मोहापायी मुलगा सुमित व पुतण्या प्रतीक या दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे समजल्यानंतर त्याचा स्मृतिभ्रंश झाला होता.
या अपघाताला आपणच जबाबदार आहोत, अशी भावना झाल्याने तो अपघात घडलेल्या दिवसापासून घरी गेला नव्हता. रुग्णालयातून सुटी मिळताच गुरुवारी नांदेडपासून काही अंतरावर रेल्वेखाली उडी मारून त्याने आपली जीवनयात्रा संपवली. उत्तरीय तपासणी व कायदेशीर सोपस्कार पूर्ण केल्यानंतर रेल्वे पोलिसांनी बालाजी गुद्धेचा मृतदेह नातेवाइकांकडे सुपूर्द केला. सायंकाळी शोकाकुल वातावरणात त्यांच्या पाíथवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. एकाच घटनेने परिवारातील दोन मुलांचा व नंतर एका तरुणाचा बळी घेतला.