मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी घेतलेले निर्णय आणि त्यांच्या कार्यपद्धतीबाबत निवडणूक आयुक्त सुखबीर सिंह संधू आणि विवेक जोशी यांनी तीव्र आक्षेप नोंदवला असल्याचा खुलासा द इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तातून करण्यात आला होता. ज्यानंतर आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी मोर्चाची हाक दिली आहे. तसंच सर्वपक्षीयांना त्यांनी मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे. याबाबत संजय राऊत यांनी रूपरेषा सांगितली आहे.
४ ऑक्टोबरच्या मोर्चाबाबत संजय राऊत काय म्हणाले?
निवडणूक आयोगाच्या भ्रष्ट कृतीविरोधात आणि लोकशाही विरोधात जे काही कार्यक्रम राबवला जातो आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हे मोदी आणि शाह यांच्या इशाऱ्यावर काम करत आहेत. भाजपाला लाभ होईल, मदत होईल अशा प्रकारचे निर्णय आणि कृती मुख्य निवडणूक आयुक्त करतात हे दोन आयुक्तांनीच सांगितलं आहे. ही लोकशाहीची हत्या आहे, स्वातंत्र्यांची गळचेपी आहे. महाराष्ट्र, दिल्ली, पश्चिम बंगाल प्रत्येक राज्यांमध्ये नावं बदलून भाजपाला मदत केली. ही भूमिका देशासाठी घातक आहे. या विरोधात देशभरात संतापाचं वातावरण आहे. जंतरमंतरला आंदोलनं सुरू झाली आहेत. मुख्य आंदोलनाची सुरूवात मुंबईतून होते आहे. कॉक्रोच जनता पार्टीचे नेते अभिजीत दिपके यांनीही आंदोलनाची हाक दिली आहे. मनसेचे प्रमुख राज ठाकरे तसंच शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा झाली. ४ ऑक्टोबरला एक स्वतंत्र मोर्चा काढला जाणार आहे. महाराष्ट्राचा संताप आणि महाराष्ट्राचा रोष दाखवला गेला पाहिजे यावर एकमत झालं आहे.
४ ऑक्टोबरला निवडणूक आयोगाविरोधातला सर्वात मोठा मोर्चा-राऊत
अभिजीत दिपके यांनी २ ऑक्टोबरला आंदोलन आयोजित केलं आहे. या आंदोलनाला शिवसेनेचा पाठिंबा आहे. त्यांना पहिल्या दिवसापासून आम्ही पाठिंबा दिला आहे यापुढेही असेल. कॉक्रोच जनता पार्टी हा राजकीय पक्ष नाही. पण राजकीय पक्षांचं जे नुकसान झालं आहे त्यामुळे शिवसेना, मनसे यांच्यासह तमाम राजकीय पक्षांना आवाहन करण्यात येतं आहे की आपण ४ तारखेला सरकारच्या विरोधात एकत्र येऊ. त्याची तयारी सुरू झाली आहे. भारताच्या इतिहासात निवडणूक आयोगाविरोधातला देशातला सर्वात मोठा मोर्चा देशाला पाहण्यास मिळेल. काँग्रेसशीही आमची याबाबत चर्चा सुरू आहे. राहुल गांधीही या विषयावर बोलत आहेत, चर्चा करत आहेत, पत्रकार परिषद घेत आहेत. महाराष्ट्रात सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे अशी ठाकरे बंधूंची इच्छा आहे. आम्ही सगळ्या पक्षांशी चर्चा सुरू आहे असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
देशातल्या संस्था मोदी आणि शाह यांचे घरगडी-राऊत
देशातल्या सगळ्या संस्था म्हणजे मोदी आणि शाह यांचे घरगडी आहेत. ज्ञानेश कुमार, सर्वोच्च न्यायालयातले काही न्यायाधीश दबावाखाली काम करत आहेत. मोदी आणि शाह यांना जे हवं आहे ते करण्यासाठी लोकशाही स्वातंत्र्य यांची हत्या करून हे सगळं चाललं आहे. ज्ञानेश कुमार आता सारवासारव करत आहेत, तीन आयुक्त एकत्र बसलेले वगैरे दाखवत आहेत पण त्याला काहीही अर्थ नाही असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. मात्र जे वातावरण देशात निर्माण झालं आहे ते पाहता दबाव झुगारून निवडणूक आयोगाला आणि सर्वोच्च न्यायालयाला त्याची दखल घ्यावी लागेल. ज्ञानेश कुमार जोपर्यंत पदावर राहतील तितका काळ तोपर्यंत आपल्या देशाच्या लोकशाहीची प्रकृती बिघडलेली असेल असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
