मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत ठाकरे बंधूंनी तिरंगा मोर्चा काढला आहे. मेट्रो सिनेमा ते महापालिका मुख्यालय असा हा मोर्चा निघाला आहे. या मोर्चामध्ये तिरंगा ध्वज हाती घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष, काँग्रेस, शिवसेना, मनसे, शेकाप हे पक्ष सहभागी झाले आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आक्रमक भाषण केलं.

हा लढा आपल्या देशाच्या स्वातंत्र्याला लढा आहे. मला आठवतं आहे की पहिल्यांदा मोदी पंतप्रधान झाले तेव्हा त्यांनी मेक इन इंडियाची घोषणा दिली होती. आम्हाला ती घोषणा मान्य आहे. पण हुकूमशहाही मेक इन इंडिया असेल तर त्याला गाडून टाकण्यासाठीच आम्ही इथे उभे राहिलो आहोत असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. बाकी सगळं मेक इन इंडिया ठीक आहे. पण हुकूमशाहा बनत असाल तर तुमची हुकूमशाही गाडून टाकली असं समजा असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. संपूर्ण देशातून या सगळ्यांनी मिळून १३ कोटी मतदार वगळून टाकले आहे. म्हणजे महाराष्ट्राची जेवढी लोकसंख्या आहे तेवढे मतदार यांनी वगळले आहेत. हे तुम्हाला मान्य आहे का? असा संतप्त सवालही यावेळी उद्धव ठाकरेंनी त्यांच्या भाषणात केला.

मुख्य निवडणूक आयुक्ताची निवडणूक का होत नाही? नेमणूक कशी होते? त्या समितीत पूर्वी सरन्यायाधीश होते त्यांना काढून टाकलं आहे. विरोधी पक्षनेता ठेवला. यांचा मंत्री त्या सरन्यायाधीशांच्या जागी आहे. म्हणजेच निवड समितीत मंत्री कोण तर अमित शाह. कमिटीमध्येच दोन विरूद्ध एक असं झालं आहे. राहुल गांधींनी असहमती दर्शवली होती तरीही ज्ञानेश कुमार यांना नेमून मोकळे झाले. कोर्टाची सुनावणी व्हायची होती पण त्याला तारीखच मिळाली नाही. ज्ञानेश कुमारांची नेमणूकच पक्षपातीपणाने झाली आहे. असाही आरोप उद्धव ठाकरेंनी केला आहे. काँग्रेस एवढं भ्रष्ट सरकार नाही असं वातावरण भाजपाने निर्माण केलं होतं. आता इंडिया अगेन्स्ट व्होटचोर हे वातावरण झालं आहे.

अमित शाह यांनी एका महिलेच्या विरोधात फौज घुसवली होती का तर तुमचा पक्ष जिंकायचा म्हणून? अशा दळभद्री लोकशाहीबाबत बाळासाहेब ठाकरे म्हणायचे की ही लोकशाही आम्हाला मान्य नाही. मी हे अंधभक्तांनीही सांगतो आहे. भाजपाला सरकार चालवता येत नाही. प्रशासन आणि भाजपा हे दोन विरूद्धअर्थी शब्द आहेत. तुम्ही जसं सरकार चालवत आहात त्याला सूड उगवणं म्हणतात. ठाण्यात आमच्या पुर्णेकरांची हत्या झाली, कुठे आहेत तुमचे पोलीस कुठे आहेत गृहमंत्री. हेच का तुमचं हिंदुत्व असे प्रश्नही उद्धव ठाकरेंनी विचारले आहेत.