सोलापूर : बार्शी शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन वर्षांपूर्वी दिवसा घरफोडी केल्याबद्दल मध्य प्रदेशातील चौकडीला बार्शीच्या सत्र न्यायालयाने दोषी धरून पाच ते सात वर्षे सक्तमजुरीसह दंडाची शिक्षा सुनावली आहे.
पवन उर्फ भुरा रामदास आर्य (वय ३८) आणि दीपेंद्रसिंह ऊर्फ चिंटू विजयसिंह राठोर (वय ४१) या दोघांना सात वर्षे सक्तमजुरी आणि दंड ठोठावण्यात आला आहे. तर त्याचे साथीदार मनोज कुमार ठाकूरदास आर्य (वय ३२) आणि देवेंद्र उर्फ राज रामलाल गुर्जर (वय ३७) यांना पाच वर्षांची सक्तमजुरी सुनावण्यात आली आहे. हे चौघेजण इंदूर (मध्य प्रदेश) येथील राहणारे आहेत. ही टोळी पोलिसांकडील नोंदीनुसार सराईत आहे.
बार्शी शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत २०२३ साली दिवसाढवळ्या घरफोडी झाली होती. या गुन्ह्याची उकल सोलापूर ग्रामीण गुन्हे शाखेच्या पोलिसांनी यशस्वीपणे करून मध्य प्रदेशातील चौकडीला जेरबंद केले होते. घरफोडीतील सोन्याचे दागिने वितळवण्यात आले. हे सोने एका सोनाराला विकण्यात आले होते. या टोळीकडून सात घरफोड्या उघडकीस आणल्या होत्या.
सोलापूर ग्रामीण गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुहास जगताप व पोलीस उपनिरीक्षक शैलेश खेडकर यांच्या पथकातील सहायक फौजदार ख्वाजा मुजावर, नारायण गोलेकर, धनाजी गाडे, मोहन मनसावाले, प्रकाश कारटकर, समीर शेख आदींच्या पथकाने हा गुन्हा उजेडात आणला होता. तपासानंतर आरोपींविरुद्ध बार्शीच्या न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. या खटल्याच्या सुनावणीत सरकारतर्फे ॲड. दिनेश देशमुख यांनी काम पाहिले.