मुलग्याची अपेक्षा असताना  मुलगीच जन्माला आली म्हणून तीन दिवसाच्या मुलीची रूग्णालयातच गळा दाबून हत्या करणार्‍या महिलेला जिल्हा सत्र न्यायालयाने दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा मंगळवारी सुनावली.

सुनिता गंगाप्पा जुट्टी (वय ३० रा. करगुट्टी, ता. हुक्केरी, जि. बेळगाव) असे या महिलेेचे नाव आहे. ही महिला बाळंतपणासाठी सांगलीतील जिल्हा सामान्य  रूग्णालयात  दाखल झाली होती. बाळंतपणानंतर तिची व बाळाची प्रकृर्ती ठीक होती. मात्र, मुलीला जन्म दिल्यापासून ती नाराज होती. मुलीच्या जन्मानंतर तिसर्‍या दिवशी महिलेने स्वत:च्या मुलीचा गळा आवळून खून केला होता. ही घटना १८ ऑक्टोंबर २०२० रोजी घडली होती.
सदरच्या महिलेने बाळाचा गळा आवळून खून करीत असताना कौशल्या शिंदे या महिलेने प्रत्यक्ष पाहिले होते. तिने तात्काळ हा प्रकार परिचारिकेला सांगितला. डॉयटरांनी तात्काळ नवजात अर्भकाला अतिदक्षता विभागात दाखल करून वाचविण्याचे प्रयत्न केले. मात्र, बाळ वाचू शकले नाही. या प्रकरणी डॉ. मधूकर जाधव यांनी विश्रामबाग पोलीस  ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

पोलीसांनी या प्रकरणाचा तपास करून महिलेविरूध्द न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. न्यायालयात  १० जणांच्या साक्षी तपासण्यात आल्यानंतर न्यायालयाने महिलेला दोषी ठरवून जन्मठेप व दोन हजार रूपये दंड अशी शिक्षा मंगळवारी सुनावली.