सांगलीत दोघांविरुद्ध गुन्हा

सांगली : घरात निघालेली घोरपड नैर्सिगक अधिवासात सोडण्याच्या नावाखाली प्राणिमित्रांनीच तिच्यावर ताव मारल्याची घटना कडेपूर येथे घडली. या प्रकरणी वन विभागाने बापलेकाविरुध्द वन्यजीव प्राणी संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करून अटक केली आहे.

याबाबत माहिती अशी, कडेपूर येथील यादवमळ्यात राहणाऱ्या वैभव कदम यांच्या घरी घोरपड आढळली होती. या बाबत सर्पमित्र म्हणून काम करणाऱ्या दादासाहेब पोळ याला घटनास्थळी पाचारण करण्यात आले. त्याने ही घोरपड पकडून नैर्सिगक अधिवासात सोडत असल्याचे सांगितले. मात्र याबाबतची माहिती वन विभागाला दिली नाही.

या घटनेची माहिती मिळताच वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पोळ यांच्या वस्तीवर जाऊन पाहिले असता त्या ठिकाणी घोरपडीचे काही अवयव, जळालेले मांस आढळून आले. पकडण्यात आलेल्या घोरपडीची हत्या करून तिचे मांस खाल्याची माहितीही मिळाली. या प्रकरणी दादासाहेब पोळ आणि त्यांचा मुलगा हर्षल पोळ या दोघांना अटक करण्यात आली असून त्यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.