आघाडी सरकारने विकास कामे करण्याऐवजी फक्त मजा-मस्ती केली. राज्यात गटा-तटात व जाती-जातीत भांडणं लावली, अशी बोचरी टीका युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी बुधवारी विरोधकांवर केली. कोल्हापूरात प्रचारसभेवेळी ते बोलत होते. राज्याचा सर्वांगीण विकास हा आपला अजेंडा असून ठाकरे घराण्याला मंत्रीपद अथवा मुख्यमंत्रीपदाची राजकीय महत्त्वकांक्षा नसल्याचे ते यावेळी म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हातकणंगलेचे शिवसेनेचे उमेदवार डॉ. सुजित मिणचेकर, कागलचे उमेदवार संजय घाटगे आणि चंदगडचे उमेदवार संग्राम कुपेकर यांच्या प्रचाराचा नारळ आज आदित्य ठाकरे यांच्या हस्ते फोडण्यात आला, यावेळी ते बोलत होते. आदित्य ठाकरे म्हणाले, आम्ही सत्तेत असलो तरी जिथं चुका होतात तिथं रस्त्यावर उतरून आंदोलन केलं. शिवसेना राजकारणाऐवजी समाजकारणाला महत्व देते.

शिवसेनेची जनतेच्या प्रश्नासंदर्भात नाळ जुळलेली आहे. आमच्यासाठी जनसेवा हीच सर्वोच्च स्थानी आहे. राज्याचा सर्वांगीण विकास हा आपला अजेंडा असून बाळासाहेब ठाकरे यांच्या स्वप्नातील महाराष्ट्र निर्माण करण्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या. राज्यात नवे उद्योग आणायचे आहेत, राज्य दुष्काळमुक्त करायचे आहे. त्यासाठी आपल्यामध्ये एकजूट ठेवून जिल्ह्यातील सर्व उमेदवार निवडून आणायचे आहेत, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

खासदार संजय मंडलिक यांनी आपला नेता बलदंड असल्यामुळे यश निश्चित असल्याचे सांगत लोकसभेला दिलेला कौल यावेळीही द्या, असे आवाहन केले. तर मतदारांना निर्णायक भूमिका घ्यावी, आपण दाखविलेला विश्वास सार्थ ठरवू असे घाटगे म्हणाले. तसेच मतदार संघातील बेरोजगारी वाढली असून औद्योगिक विकास खुंटला असल्याचे कुपेकर यांनी सांगितले. आंबे ओहोळसह सर्व अपूर्ण प्रकल्प पूर्ण करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. तर शिवसेनेमुळे मला सलग दोनदा आमदार म्हणून जनतेची कामे करणाची संधी मिळाल्याचे डॉ. मिणचेकर यांनी सांगितले. या कालावधीत कोट्यवधी रुपयांच्या विकासकामांचा डोंगर उभा करून लोकांमध्ये आदराचे स्थान निर्माण केल्याने निश्चितच हॅटट्रिक साधण्याची संधी मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The congress ncp government has made caste and caste conflicts says aditya thackeray at kolhapur aau
First published on: 09-10-2019 at 20:01 IST