सातारा – ॲड उज्ज्वल निकम यांनी लोकसभेची निवडणूक सत्ताधारी पक्षाकडून लढवलेली असल्यामुळे ते सरकारी वकील म्हणून राहण्यास अपात्र आहेत. त्यामुळे त्यांना माझ्याशी संबंधित खटल्याचे कामकाज चालविल्यास बंदी घालावी. हा खटला चालवण्यास माझी हरकत असल्याचे धोम वाई खून खटल्याचा मुख्य आरोपी संतोष पोळ याने न्यायालयाला केलेला अर्ज न्यायालयाने आज फेटाळून लावला.

धोम वाई खून खटल्याची सुनावणी वाई येथील विभागीय जिल्हा न्यायालयात जिल्हा न्यायाधीश निकम यांच्या समोर सुरू आहे. त्यासाठी संतोष पोळ याला न्यायालयात आणण्यात आले होते. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सुनावणीसाठी सरकारी वकील ॲड उज्ज्वल निकम सहाय्यक मिलिंद ओक उपस्थित होते.

हेही वाचा – सोलापूर : कुर्डूवाडीत मराठा आंदोलकांनी शरद पवारांची मोटार अडवून विचारला जाब

ॲड उज्ज्वल निकम यांनी लोकसभेची निवडणूक सत्ताधारी भारतीय जनता पक्षाकडून लढवलेली असल्यामुळे ते सरकारी वकील म्हणून राहण्यास अपात्र आहेत. त्यांना आता सरकारी वकील म्हणून कामकाज पाहण्यास न्यायालयाने बंदी करावी असा विनंती अर्ज या खटल्यातील मुख्य आरोपी संतोष पोळ याने न्यायालयाला केला होता. यावर पहिल्या सत्रात सुनावणी झाली. भारतीय संविधानाप्रमाणे कोणालाही कोणतीही निवडणूक लढविण्याचा अधिकार आहे. त्या अधिकारात मी निवडणूक लढविली आहे, असे उज्ज्वल निकम त्यांनी न्यायालयास सांगितले. यावर न्यायालयात दोन्ही वकिलांनी युक्तिवाद केला. यानंतर संतोष पोळ याचा हरकत अर्ज फेटाळून लावला.

या खटल्यातील साक्षीदार डॉ विद्याधर घोटवडेकर आणि त्यांची पत्नी हे भाजप आणि संघाचे कार्यकर्ते आहेत आणि उज्ज्वल निकम यांनी भाजपाकडून निवडणूक लढवली आहे. त्यामुळे उज्ज्वल निकम घोटवडेकर यांच्या बाजूने साक्ष घेतील व त्यांना निर्दोष सोडतील. खटल्याच्या अनुषंगाने ते साक्ष घेणार नाहीत असे न्यायालयाच्या निदर्शनास आणण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या निवडणुकीचा या खटल्यावर मोठा परिणाम होईल असेही त्याने न्यायालयात सांगितले. त्यामुळे उज्ज्वल निकम यांना या खटल्यात अपात्र ठरवावे असेही पोळ याच्या वतीने न्यायालयास सांगितले. मात्र न्यायालयाने पोळ याच्यावर वेगवेगळ्या वेळी वेगळे आरोप करत असल्याबद्दल नाराजी व्यक्त करत त्याच्या वक्तव्याची गंभीर दखल घेत त्याचे सर्व आरोप फेटाळून लावले.

हेही वाचा – राज्यसभेची एक जागा अजित पवार गटाला, देवेंद्र फडणवीस यांचे विधान; कुणाला मिळणार उमेदवारी?

यावेळी माफीची साक्षीदार ज्योती मांढरे हिचा उलट तपासात उज्ज्वल निकम यांनी घेतला. एका प्रश्नाचे उत्तर देताना न्यायालयात सांगितले की, तिने आणि संतोष पोळ याने दहा सिम कार्ड आलटून पालटून वापरली होती. यापुढे या खटल्याचे कागदोपत्री पुराव्याच्या आधारे कामकाज होणार आहे. संतोष पोळ याच्या वतीने ॲड दिनेश धुमाळ यांनी काम पाहिले.