scorecardresearch

अमरावतीत ‘देवराई’चा वारसा जपण्याचा वसा

देवराई म्हणजे स्थानिकांनी श्रद्धेने, देवाच्या नावाने, वर्षांनुवर्षे राखलेले निसर्गनिर्मित जंगल. असा समृद्ध नैसर्गिक वारसा पिढय़ान् पिढय़ा जतन केला गेला.

अमरावतीत ‘देवराई’चा वारसा जपण्याचा वसा
अमरावतीत ‘देवराई’चा वारसा जपण्याचा वसा

मोहन अटाळकर

अमरावती : देवराई म्हणजे स्थानिकांनी श्रद्धेने, देवाच्या नावाने, वर्षांनुवर्षे राखलेले निसर्गनिर्मित जंगल. असा समृद्ध नैसर्गिक वारसा पिढय़ान् पिढय़ा जतन केला गेला. वृक्षवेलींची गर्द दाटी, वैशिष्टय़पूर्ण प्राणिपक्ष्यांची उपस्थिती, पाण्याचा स्रोत, अशी काही वैशिष्टय़े. परंतु, सध्या विविध कारणांमुळे, विकासाच्या रेटय़ामुळे, होत असणाऱ्या नैसर्गिक ऱ्हासाच्या पार्श्वभूमीवर या देवरायांना धोका निर्माण झाला. अशा स्थितीत अमरावती जिल्ह्यात तयार करण्यात आलेल्या पाच देवरायांनी हा समृद्ध वारसा जपण्याचा मार्ग प्रशस्त केला आहे.

निसर्गसंपदेचा ऱ्हास भरून काढण्याच्या दृष्टीने पुणे येथील रघुनाथ ढोले पाटील संचालित देवराई फाऊंडेशनच्या मदतीने प्रथमच अमरावती जिल्ह्यात एकाच वेळी पाच देवराई प्रकल्पांची स्थापना करण्यात आली आहे. प्रत्येक देवराईमध्ये सुमारे चाळीस हजार चौरस फूट क्षेत्रात ४०० ग्रिड्समध्ये सुमारे १०० प्रजातींच्या रोपांची लागवड करण्यात आली आहे. या जागेच्या केंद्रस्थानी बैठकीचे स्थान निर्माण केलेले आहे, अशी माहिती प्रकल्प अधिकारी डॉ. राजेश शेरेकर यांनी दिली.

या प्रकल्प उभारणीमध्ये श्री अंबादेवी ट्रस्टचे विश्वस्त व तपोवन संस्थेचे अध्यक्ष डॉ. अतुल आळशी, उद्योजक प्रमोद देशमुख तळवेलकर, सहकार नेते राजाभाऊ देशमुख तळवेलकर तसेच तपोवन संस्थेचे उपाध्यक्ष प्रा. सुभाष गवई, विश्वस्त विवेक मराठे, जुबिन दोटीवाला, सचिव सहदेव गोळे यांचे मोलाचे सहकार्य लाभल्याचे डॉ. राजेश शेरेकर सांगतात.

विविध प्रजाती असलेली देवराई ही विद्यार्थी व कृषी तज्ज्ञांसाठी एक पर्यटनस्थळ होऊ शकते. देवराईतून वाढलेल्या झाडांपासून आपल्याला बिया मिळतात ज्यांच्यापासून पुन्हा रोपनिर्मिती होऊन इतर ठिकाणी रोपण करता फायदेशीर ठरतात. या देवरायांमध्ये जांभूळ, ऐन, हिरडा, पिम्परण, मोगरा, बिजा, चेरी, सीता अशोक, लाकुच, बुद्धा नारळ, पिवळी कॉरांती, ताम्हण, तुती, वावाळ, अग्निमंत या व इतर अशा विविध प्रजातींची लागवड करण्यात आली आहे.

अमरावती शहरानजीकच्या तपोवन परिसरातील एका देवराईचे नुकतेच लोकार्पण करण्यात आले, चांदूर रेल्वेनजीक यशवंत देवराई, नांदगावपेठनजीक पांडुरंग देवराई, चांदूर बाजार तालुक्यातील तळवेळ येथे नरसिंग देवराई तसेच कृष्णार्पण देवराई, अशा एकूण पाच देवरायांची निर्मिती करण्यात येत आहे.

नष्ट झालेल्या वनस्पती, वृक्षवेलींचे पुनरुज्जीवन होऊन त्यांच्यावर अवलंबून असलेल्या जीवसृष्टीचे पुनर्निर्माण होणे गरजेचे असून अशा देवरायांमुळे झाडांच्या माहितीचे ग्रंथालय, बियांचे संचय (बँक), बियांचे प्रसरण होऊन पूर्वीप्रमाणे अनेक जंगल निर्माण होण्यास मदत होईल, असा सूर पाच देवराईंच्या लोकार्पण प्रसंगी मान्यवरांनी व्यक्त केला.

या कार्यक्रमाला अमरावती गार्डन क्लबच्या माजी अध्यक्ष निर्मला देशमुख, श्री अंबादेवी संस्थानच्या अध्यक्ष विद्या देशपांडे, विधि महाविद्यालयाच्या प्राचार्य अ‍ॅड. वर्षां देशमुख, तपोवन संस्थेचे अध्यक्ष डॉ. अतुल आळशी, उपाध्यक्ष प्रा. डॉ. सुभाष गवई, विश्वस्त विवेक मराठे, वसंत बुटके, विद्या देसाई, सचिव सहदेव गोळे, पर्यावरणतज्ज्ञ श्रीनिवास राव, देवराई फाऊंडेशन पुणेचे संस्थापक अध्यक्ष रघुनाथ ढोले पाटील, सुरेश शिंदे, कमलताई गवई आदी उपस्थित होते.

प्रकल्पाधिकारी डॉ. राजेश शेरेकर यांनी देवराई या संकल्पनेचा सिद्धांत समजावून सांगितला. तपोवन येथील देवराई ही एक आदर्श देवराई म्हणून स्थापित केली गेलेली आहे, ज्याची प्रेरणा या देवराईला भेट देणारा प्रत्येक व्यक्ती निश्चितच घेईल. या देवराईच्या स्थापनेसाठी तपोवन संस्थेच्या परिसरात जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी संस्थेचे अध्यक्ष डॉ. अतुल आळशी आणि संचालक मंडळाचे आभार मानले. आजपर्यंत देवराई फाऊंडेशनने महाराष्ट्रात व राज्याबाहेर २६ लाख रोपांचे वाटप केलेले असून १६५ देवराई, ४२ घनवन तथा २५ रोपवाटिकांची स्थापना केलेली आहे. फाऊंडेशनतर्फे रोपवाटप विनामूल्य केले जाते, अशी माहिती देवराई फाऊंडेशन अध्यक्ष रघुनाथ ढोले पाटील यांनी दिली. हवेमार्फत, पक्षांमार्फत, मधमाशा, फुलपाखरांमार्फत लाखो बियांचे प्रसरण होऊ अनेक बिया रूजून पूर्वीसारखी जंगल निर्माण होण्यास मदत होईल. कृषी पर्यटनासाठी देवराई अभिनव उपक्रम होऊ शकते. देवराई एकप्रकारची ऑक्सिजन बँक होऊ शकते. अनेक सजीवांना आश्रयस्थान मिळेल, कायमस्वरूपी अन्न-पाण्याची सोय होऊ शकते. मातीची धूप थांबते. हवेतील प्रदूषित धुलीकण रोखण्यास मदत होते. अशी ही मानवनिर्मित देवराई ही काळाची गरज असून वृक्षलागवडीस एक प्रकारची दिशादर्शक देवराई आहे, असे या वेळी सांगण्यात आले.

स्वातंत्र्यसेनानी आणि समाजसेवक डॉ. शिवाजीराव पटवर्धन यांनी कुष्ठरुग्णांसाठी उभारलेल्या तपोवन परिसरात एक आदर्श अशा वनराईची निर्मिती झाली आहे. सकारात्मक भावनेतून काम करणाऱ्या संस्थांना सहकार्य करण्याचा तपोवन संस्थेचा नेहमीच प्रयत्न राहिला आहे. यातून लोकांना निश्चितपणे प्रेरणा मिळेल. इतकी वर्षे जतन केलेला वारसा यापुढेही शास्त्रीय आणि पर्यावरणीय दृष्टिकोनातून जपण्यासाठी लोकांनी पुढाकार घ्यायला हवा.

– डॉ. सुभाष गवई, उपाध्यक्ष, तपोवन.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या