Premium

सांगली: भाजपच्या माघारीने माणगंगा कारखाना शिवसेनेच्या ताब्यात

माणगंगा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत भाजपच्या देशमुख गटांने धक्कादायकरित्या माघार घेतल्याने शिवसेनेचे (शिंदे गट) तानाजी पाटील यांच्या गटाचे सर्व संचालक अविरोध निवडून आले.

Manganga Sugar Factory
भाजपच्या माघारीने माणगंगा कारखाना शिवसेनेच्या ताब्यात

सांगली : माणगंगा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत भाजपच्या देशमुख गटांने धक्कादायकरित्या माघार घेतल्याने शिवसेनेचे (शिंदे गट) तानाजी पाटील यांच्या गटाचे सर्व संचालक अविरोध निवडून आले. गेली चार वर्षे थकित कर्जाच्या वसुलीसाठी जिल्हा बँकेने कारखाना ताब्यात असून देशमुख गटाच्या माधारीचा निर्णय धक्कादायक मानला जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आटपाडी येथील माणगंगा सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. संचालक मंडळाच्या १७ जागांसाठी भाजपचे माजी आमदार राजेंद्र देशमुख यांच्यासह जिल्हा बँकेचे संचालक शिवसेनेचे तानाजी पाटील यांच्या गटाकडून रिंगणात तब्बल ७६ उमेदवारी अर्ज होते. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत होती. या मुदतीत देशमुख यांच्या गटाने धक्कातंत्राचा वापर करीत आपल्या गटाचे सर्व उमेदवारी अर्ज मागे धेतल्याने रिंगणात केवळ पाटील यांच्या गटाचे १७ उमेदवारी अर्ज शिल्लक राहिल्याने ही निवडणूक अविरोध झाली आहे. आता याची घोषणा होण्याची औपचारिकता उरली आहे.

गेल्या चार वर्षापासून हा कारखाना आर्थिक संकटामुळे बंद होता. आता टेंभू योजनेचे पाणी परिसरात आल्याने उस लागवडीखालील क्षेत्रही वाढले असल्याने कारखाना सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. स्व. बाबासाहेब देशमुख यांनी १९८६ मध्ये या कारखान्याची उभारणी केली होती. दुष्काळी भाग असल्याने उसाची उपलब्धता पुरेशी नसतानाही कारखाना चालू होता. कारखान्याचे आटपाडीसह सांगोला व माण तालुक्यात ११ हजार ५०५ सभासद असून यापैकी ५० टक्के सभासद हयात आहेत.

कारखाना निवडणुकीच्या निमित्ताने भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांच्यात चुरशीने लढत होण्याची अपेक्षा राजकीय क्षेत्रात होती. मात्र, देशमुख गटाने निवडणुकीतून माघार घेतल्याने हा कारखाना शिवसेनेचे पाटील यांच्या ताब्यात गेला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 31-05-2023 at 19:13 IST
Next Story
मुंबई गोवा महामार्गावर अवजड वाहनांना बंदी, शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने गृह विभागाचे आदेश