राज्य शासनाने इचलकरंजी नगरपालिकेचा दर्जा वाढ करून महापालिकेचा दर्जा दिला आहे . याबाबत राज्य शासनाने आज अधिसूचना काढले आहे, अशी माहिती शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने यांनी लोकसत्ताशी बोलताना दिली. राज्यातील श्रीमंत नगरपालिका अशी इचलकरंजी नगरपालिकेची ओळख आहे. नगरपालिकेच्या शेवटच्या सभागृहात महापालिका दर्जा मिळावा असा ठराव करण्यात आला होता. त्यास सर्व पक्षांनी मान्यता दिली होती. जनतेच्या मागणीचा खासदार माने हे राज्य शासनाकडे पाठपुरावा करत होते .
यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी सातत्याने चर्चा केली होती. त्यानुसार राज्य शासनाने इचलकरंजी नगरपालिकाची घोषणा केली आहे.
कोल्हापुरात राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी वर्ष साजरे केले जात आहे . यानिमित्त कृतज्ञता पर्वाचे आयोजन केले आहे. उद्या मुख्य समारंभ होत असताना त्याच्या पूर्वसंध्येला राज्यशासनाने इचलकरंजी महानगरपालिका घोषित करण्याचा निर्णय घेतला आहे, असे खासदार माने यांनी सांगितले.
इचलकरंजी ही राज्यातील २८वी महापालिका असणार आहे. गेली सहा वर्षे एक ही महापालिका जाहीर झालेली नव्हती. राज्यात महाविकास आघाडी शासन सत्तेत आल्यानंतर अस्तित्वात आलेली ही पहिली महापालिका आहे. नगरपालिकेची हद्दवाढ कायम ठेवून तिला महापालिकेचा दर्जा देण्यात आला आहे,असेही माने यांनी स्पष्ट केले.याकामी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह इचलकरंजी ते सर्वपक्षीयांनी सहकार्य केले,असेही त्यांनी नमूद केले.