प्रबोध देशपांडे

अकोला : पावसाळा आणि हिवाळय़ात ‘भाव’ खाऊन जाणारा कांदा सध्या शेतकऱ्यांना अल्प भावावरूनच रडवत असल्याचे चित्र आहे. गेल्या वर्षी चांगला पाऊस झाल्याने शेतकरी वर्ग कांद्याच्या पिकाकडे वळला. कांदा पिकाला नैसर्गिक संकटे व रोगराईचा देखील फटका बसला. तरीही कांद्याचे भरघोस उत्पादन झाले. शेतातील कांदा बाजारपेठेत येत असतांना त्याचे भाव पडले आहेत. उत्पादन खर्चही निघत नसल्याने बळीराजा संकटात सापडला आहे.

पश्चिम विदर्भातील विविध भागात शेतकऱ्यांनी रब्बीच्या हंगामामध्ये कांद्याची मोठय़ा प्रमाणात लागवड केली. साधारणत: डिसेंबर-जानेवारी महिन्यात कांद्याची पेरणी झाली. गेल्या वर्षी चांगला पाऊस झाल्याने जमिनीत ओलावा होता. त्यामुळे कांद्याचे उत्पादनात मोठी वाढ होईल, अशी शेतकऱ्यांना आशा होती. नैसर्गिक संकटाचा कांद्यावर परिणाम झाला. कांदा पिकाच्या सुरुवातीच्या काळात अतिथंडी पडली, तर फेब्रुवारी महिन्यानंतर तापमानात प्रचंड वाढ झाली. काही भागात अवकाळी पावसाचा देखील कांद्याला फटका बसला. वाढते तापमान लक्षात घेता पिकांना पाण्याची गरज असते. मात्र, गेल्या काही महिन्यांमध्ये महावितरणकडून भारनियमन करण्यात येत आहे. पिकाला पाणी देण्यासाठी वीज मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली. विविध रोगराईने देखील कांदा पिकाला ग्रासले होते. रासायनिक औषधांची फवारणी करून देखील कीड, अळींवर त्याचा परिणाम झाला नाही. रासायनिक औषधांच्या किंमती वाढत असतांना त्याची क्षमता कमी होत असल्याने किडींवर त्याचा कुठलाही परिणाम होत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. विविध अडचणी व संकटांवर मात करून शेतकऱ्यांनी कांद्याचे उत्पादन चांगले घेतले.

बळीराजाच्या अथक परिश्रमानंतर कांदा घरात आला. तो विक्रीला काढला असता कांद्याचे भाव पडले आहेत. कांद्याच्या लागवडीसाठी बी-बियाणे, खते, रायायनिक औषधी, मजुरी आदी संपूर्ण सुमारे ४० हजार रुपयांचा एकरी खर्च लागतो. ७५ ते १५० क्विंटलदरम्यान कांद्याचे उत्पादन होते. चांगली जमीन असल्यास काही ठिकाणी २०० क्विंटलपर्यंत देखील उत्पादन गेले. आता भरघोस प्रमाणांत कांदा उपलब्ध असल्याने व्यापाऱ्यांकडून मातीमोल भावात कांद्याची मागणी करण्यात येते. घाऊक बाजारपेठेत अगदी ३ रुपये किलो दरापासून ते ६ रुपये किलोपर्यंतचा दर कांद्याला मिळत आहे. सध्या व्यापारी चांगल्या दर्जाचा कांदा ५ ते ६ रुपये किलो दराने मागत आहेत. त्यामध्येही चाळणी लावून हलक्या दर्जाचा कांदा घेण्यास व्यापारी नकार देतात. उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

अत्यल्प दरामुळे अनेक शेतकऱ्यांच्या घरात कांदा पडून आहे. आधीच नैसर्गिक आपत्तीने शेतकरी खचलेला. खरीपातील विविध पिकांची नुकसानभरपाई निघण्यासाठी शेतकऱ्यांनी कांद्याची लागवड केली. पुन्हा नैसर्गिक आपत्ती आल्याने कांद्यावे नुकसान झाले. कांदा सडण्याचे प्रमाण वाढून तो फेकावा लागतो. कर्जबाजारी होऊन शेतकरी पेरणी करतात. घरात उत्पादन आल्यावर कर्ज फेडण्यासाठी तगादा लावला जातो. त्यामुळे नाइलाजाने मिळेत त्या भावात शेतकऱ्यांना कांदा विकावा लागतो. काही शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांना अत्यल्प भावात कांदा देण्याऐवजी स्वत: रस्त्यावर ट्रॅक्टर लावून कांद्याची विक्री केली. ४०-५० किलोच्या कट्टय़ांमधून थेट ग्राहकांना दिले. मात्र, ग्राहकही पडलेल्या भावाने मागणी करीत असल्याने शेतकरी हतबल झाला आहे.

अर्थचक्र अनिश्चित

कांद्याचे अर्थचक्र अनिश्चित स्वरूपाचे आहे. एप्रिल-मे महिन्यात कांद्याचे उत्पादन येते. त्या काळात भाव पडलेले असतात. जुलै-ऑगस्ट महिन्यानंतर कांद्याला चांगले भाव मिळण्यास सुरुवात होते. विक्रमी दर ग्राहकांच्या डोळय़ात पाणी आणत असतांना शेतकऱ्यांकडे कांदा उपलब्ध नसतो. किरकोळ अपवाद वगळता शेतकऱ्यांकडे साठवणूक करण्याची सुविधा नाही. त्यांच्यात पैसे गुंतवून ठेवण्याची क्षमता देखील नसते. त्यामुळे अल्पदरात शेतकरी कांदा विकून मोकळे होतात. कांद्याची साठेबाजी करून भाव वाढल्यावर व्यापारी मोठय़ा प्रमाणात नफा कमावतात.

कांद्याला मातीमोल भाव मिळत आहे. उत्पादन खर्चही निघत नाही. कांदा काढणे देखील परवडणारे नाही. मेंढरांना चरण्यासाठी शेतात कांदा उत्पादनावर सोडण्यात आले. त्या मोबदल्यात मेंढीपालन करणाऱ्यांकडून एकरी चार हजार रुपये मिळतात. कांद्याने अक्षरश: रडवले आहे. ५० टक्के क्षेत्रावर हेच चित्र आहे.

– अतुल बेंदरकार, कांदा उत्पादक, संग्रामपूर, बुलढाणा.