कल्याण डोंबिवली महापालिकेच्या डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात दोन डॉक्टर आणि दोन परिचारिका यांना ऑन ड्युटी असताना शिंदे शिवसेनेचे डोंबिवली पश्चिमेतील कोपर भागाचे नगरसेवक रमेश सुकऱ्या म्हात्रे आणि त्यांच्या समर्थकांनी केलेल्या मारहाण प्रकरणी विष्णुनगर पोलिसांनी मंगळवारी रात्री म्हात्रे यांच्या तीन समर्थकांना अटक केली आहे. आम्ही आता रमेश म्हात्रेंच्या अटकेची प्रक्रिया सुरु केली आहे अशी माहिती विष्णुनगर पोलीस ठाण्याचे पोलीस अधीक्षक सुहास हेमाडे यांनी दिली.
पोलीस अधीक्षक सुहास हेमाडे यांनी काय म्हटलंय?
पाच पैकी तिघांना अटक करण्यात आली आहे त्यापैकी एक अक्षय करंडे, दुसरा रमेश पवार आणि तिसरा प्रमोद निकम असे हे तीन आरोपी आहेत. एकूण पाच आरोपी आहेत. त्यापैकी तिघांना अटक केली आहे. नगरसेवक रमेश म्हात्रे यांनाही अटक करण्याची प्रक्रिया आम्ही सुरु केली आहे. यामध्ये एक महिला आरोपी आहे अशी माहिती कल्याणचे पोलीस अधीक्षक सुहास हेमाडे यांनी दिली आहे. सदर प्रकरणाची चौकशी सुरु आहे. आम्ही आमची कारवाई सुरु केली आहे. या गुन्ह्यातील फिर्यादी डॉ. वैभव साळुंके आणि महिला डॉक्टर हे दोघंही ऑन ड्युटी होते. त्यावेळी रुग्णाच्या नातेवाईकांसह हे आरोपीही आले. त्यांनी डॉक्टरांशी हुज्जत घातली, त्यानंतर हे प्रकरण मारहाणीपर्यंत गेलं असंही हेमाडे यांनी सांगितलं.
नेमकं प्रकरण काय?
डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या एका रुग्णाच्या उपचारावरून वाद निर्माण झाला होता. या वादाचे रूपांतर धक्काबुक्की आणि मारहाणीत झाले. या घटनेत शिवसेनेचे( शिंदे गट) नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्यासह काही जणांनी डॉक्टर, परिचारिका आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याचा आरोप आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर राज्यभरातील डॉक्टरांमध्ये संतापाची लाट उसळली. मानपाडा पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डॉक्टरांना केलेल्या मारहाणीचा सर्वस्तरीय निषेध
कल्याण, डोंबिवली शहर परिसरासह राज्यातील विविध औषधोपचरांच्या डॉक्टरांनी शास्त्रीनगर रुग्णालयातील नवतरूण महिला, पुरूष डॉक्टरांसह नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी केलेल्या गैरकृत्यांबद्दल तीव्र संताप व्यक्त केला आहे. शासनाने स्वतःहून पुढाकार घेऊन या नगरसेवकावर कठोर कारवाईसाठी पुढाकार घ्यावा, अशी प्रतिक्रिया राज्यभरातील डॉक्टर, जाणते नागरिक, वकील, सामाजिक कार्यकर्त्यांकडून उमटत आहेत. मारहाण प्रकरणात रमेश म्हात्रे मुख्य गुन्हा दाखल इसम आहेत. त्यामुळे त्यांना पोलीस का अटक करत नाहीत, असे प्रश्न डॉक्टर संघटना, विविध स्तरातील जाणत्या नागरिकांकडून करण्यात येत आहेत. म्हात्रे यांना अटक करण्यात काही राजकीय दबाव असेल तर पोलिसांनी तसे जाहीर करावे, अशीही वैद्यकीय क्षेत्राची मागणी आहे.
