“महाविकासआघाडीचं सरकार स्थापन झाल्यापासून, राष्ट्रवादी काँग्रेस ज्या पद्धतीने शिवसेनेला दाबून किंबहूना दबाव टाकून, पक्षाचा विस्तार करतय आणि शिवसेनेला नुकसान पोहचतय. या सगळ्या गोष्टींची घुसमट, त्या वेदना, संवेदना, भावना अनंत गीते यांच्या वक्तव्यामधून आज आल्यात, असं माझं म्हणणं आहे. तरी, अनंत गीतेंची भूमिका बरोबर आहे, की संजय राऊत यांची हे शिवसेनेने स्पष्ट करावं.” असं विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आज पत्रकारपरिषदेत म्हटलं आहे. यावेळी भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांची देखील उपस्थिती होती.

यावेळी प्रवीण दरेकर म्हणाले की, “जी काँग्रेस व राष्ट्रवादीबरोबर अनैसर्गिक युती झाली, ती एक तडजोड होती. हा अनंत गीते यांनी अत्यंत स्पष्टपणे केलेला उल्लेख खरा आहे. म्हणून, आज शिवसैनिकांचं तालुकास्तरावर जे खच्चीकरण होतंय, शिवसेनेचे आमदार ज्या ज्या विधानसभा मतदारसंघात काम करत आहेत, त्या ठिकाणी अर्थमंत्र्यांच्या माध्यमातून निधी देण्याबाबात जो दुजाभाव आहे. जिल्हा समिती, राज्य समितींच्या नेमणुका असो, ज्या पद्धतीने शिवसेनेचा मुख्यमंत्री असतानाही वाटाण्याच्या अक्षदा लावल्या जात आहेत. या सगळ्यांचा परीपाक म्हणून, अनंत गीते यांचं हे विधान समोर आलेलं आहे. की, शरद पवार हे आमचे नेते होऊ शकत नाहीत.”

कुणी कोणाच्या पाठीत खंजीर खूपसून सरकार बनवलं आहे हे सर्वांना माहिती आहे –

तसेच, “माझी माध्यमांद्वारे राज्याचे मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुखांना विचारणा आहे की, अनंत गीते यांचे विधान संजय राऊत यांनी खोडलेलं आहे की ते महाराष्ट्राचे, देशाचे नेते आहेत. या संदर्भात शिवसेनेने अनंत गीते यांची भूमिका बरोबर आहे की संजय राऊत यांची अधिकृत पक्षाची भूमिका आहे? हे स्पष्ट होण्याची आवश्यकता आहे. नेमकी पक्षाची काय भूमिका या संभ्रमावस्थेत शिवसैनिक दिसत आहेत. तसेच, अनंत गीते यांनी पाठीत खंजीर खूपसण्यासंदर्भात देखील वक्तव्य केलेलं आहे. त्या संदर्भात देखील संपूर्ण महाराष्ट्राला हा विषय माहिती आहे. कुणी कोणाच्या पाठीत खंजीर खूपसून सरकार बनवलं आहे हे सर्वांना माहिती आहे.” असंही दरेकर म्हणाले.

दोन्ही पक्षांमध्ये व सरकारमध्ये काय चाललंय? हे सांगायला कुठल्या ज्योतिषाची गरज नाही –

याचबरोबर, “अनंत गीते यांचं वक्तव्य झाल्यानंतर रायगडचे खासदार व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांनी तातडीने पत्रकारपरिषद घेतली. मला वाटतं यावरून दोन्ही पक्षांमध्ये व सरकारमध्ये काय चाललंय? हे सांगायला कुठल्या ज्योतिषाची गरज नाही. जर सरकारमध्ये सुसंवाद आहे, सरकारमध्ये समन्वायाचं वातावरण आहे, अशा प्रकारची वक्तव्यं येतात व सारवासरव होते. तेव्हा गीते यांचं वक्तव्यं प्रसार माध्यमांवर आल्यानंतर थोडं देखील थांबायची तयारी राष्ट्रवादी पक्षात दिसत नाही. याचा अर्थ शिवसेनेबरोबर नांदायचं आहे की, शिवसेनेच्या अरे ला कारे करायची भूमिका शिवसेनेने स्वीकारली आहे. ही देखील यामधून स्पष्ट होते.” असंही यावेळी दरेकर यांनी बोलून दाखवलं.

“अडगळीत पडलेल्या…,” शरद पवार आमचे नेते नाहीत म्हणणाऱ्या अनंत गीतेंना राष्ट्रवादीचं प्रत्युत्तर

“अनंत गीते यांचं समर्थन करण्याचं आमचं काही कारण नाही, परंतु ज्या पद्धतीने सुनील तटकरे यांनी अनंत गीते यांच्यावर टीका केली, की सहन होत नाही, सांगता येत नाही. अनंत गीते अडगळती गेलेले आहेत, त्यांना काही स्थान उरलेलं नाही. त्याचं वय झालेलं आहे, ते वैफल्यग्रस्त आहेत. अशाप्रकारची आपल्या एका वरिष्ठ नेत्यावर शिवसेनेच्या स्थापनेत ज्यांनी बाळासाहेबांसोबत अहोरात्र परिश्रम घेतले. पक्ष उभारणी केली. कोकणातील कुणबी समाज त्यांच्या माध्यमातून शिवसेनेच्या झेंड्याखाली एकवटला. त्या अनंत गीते यांच्यवार टीका झाल्यानंतर एकही निषेधाचं वक्तव्यं सुनील तटकरे किंवा राष्ट्रवादीच्या संदर्भात येत नाही. मग या पक्ष प्रमुखांच्या सूचना आहेत. की, शिवसैनिकांचं मत आहे की शिवसैनिक आता कंटाळलेले आहेत. या सगळ्या गोष्टी पक्षाच्यादृष्टने महाराष्ट्रातील जनतेसमोर, येणं अत्यंत आवश्यक आहे. अनंत गीते यांचे व्यक्तिमत्व संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. सहा-सात वेळा खासदार, केंद्रात मंत्री, शिवसेनेचे वरिष्ठ नेते म्हणून काम करत असताना, एकही भ्रष्टाचाराचा डाग, आरोप, टीका या महाराष्ट्रात कुणी केली नाही. बोट दाखवण्या इतकी जागा देखील त्यांनी ठेवली नाही. एवढी चारित्र्यसंपन्नता राज्याच्या राजकारणात काही मूठभर लोकांमध्ये आहे. त्यामध्ये अनंत गीते आहेत. हे मला सांगायला निश्चित अभिमान वाटतो.” असं प्रवीण दरेकर यांनी बोलून दाखवलं.

सुनील तटकरे आपणही अडगळीत होता –

“सुनील तटकरे आपणही अडगळीत होतात. मोदींच्या लाटेत शिवसेनेत काही अंतर्गत फंदफितूरी झाली आणि निसटता विजय आपल्याला मिळाला. राजकारणात यश-अपयश येत असतं. म्हणून पदावरून माणसाची किंमत नसते, तर पद उपभोगत असताना आपली पत आपण काय केली? याचा लेखाजोखा जनता मांडत असते. सुनील तटकरे तुमची पत व अनंत गीते यांची पत, आपण जरी खासदार म्हणून जिंकला असलात तरी निश्चितच अनंत गीते यांची पत आजही पराभूत झाल्यानंतर, कोकणवासीयांच्या मनात निश्चतपणे आहे. हे मला एक कोकणचा सुपूत्र म्हणून आणि मी देखील त्यांच्या हाताखाली कधीकाळी काम केलेलं आहे. हे सांगायला मला अभिमान वाटतो. त्यामुळे चारित्र्याच्या किंवा नेतृत्वाच्या गोष्टी कुणी आणि कशा कराव्यात हा देखील एक महत्वाचा प्रश्न आहे.” असा टोला देखील दरेकरांनी यावेळी लगावला.