त्रिपुरात झालेल्या घटनेच्या निषेधार्थ काल राज्यात मुस्लिम संघटनांनी राज्यात विविध ठिकाणी निवेदने दिली. मात्र काही ठिकाणी याला हिंसक वळण लागलं होतं, अमरावतीतही गालबोट लागलं. या पार्श्वभुमिवर आज अमरावती बंदचे आवाहन भाजपाने केलं होतं. मात्र भाजपच्या या बंदच्या आवाहनला हिंसक वळण लागले. आक्रमक आंदोलकांनी दुकानांवर दगडफेक करत तोडफोड केली. यानंतर कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनीही आक्रमक पवित्रा घेत दगडफेक करणाऱ्यांवर लाठीचार्ज केला. यावर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी शांततेचे आवाहन केलं आहे. “भाजपचा मोर्चा शांततेने होईल अशी अपेक्षा होती, मात्र वेगळं वळण लागलेलं आहे. पोलीस विभाग आवश्यक पावलं टाकत आहे, विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांशी बोलत आहेत, राज्य महत्त्वाचे आहे ,सर्वांनीच सहकार्य करावे अशी विनंती केली आहे. समाज माध्यमातून कोणी चिथावणी देत असेल तर कारवाई केली जाईल”, असं गृहमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे.