scorecardresearch

“राज्य सरकार स्थानिक निवडणुका टाळून लोकशाहीचा…” नेमकं काय म्हणाले पृथ्वीराज चव्हाण?

राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारच्या वैधतेबाबतचा फैसला सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्याने राज्य सरकारच्या भवितव्यावर ही टांगती तलवारच आहे.

prithviraj chavan shinde fadanvis government
नेमकं काय म्हणाले पृथ्वीराज चव्हाण?

कराड : केंद्रीय निवडणूक आयोगाकडून शिवसेना पक्ष व चिन्ह एकनाथ शिंदे गटाला देण्यात आल्याचा निर्णय अनपेक्षित असून, या निर्णयातून सर्वोच्च न्यायालयावर दबाव आणण्यात आल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कराडमध्ये पत्रकार परिषदेत केला. कसब्यातील निवडणूक निकालाचा संदर्भ देत येत्या सर्वच निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीचे सूत्र कायम रहावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. 

चव्हाण म्हणाले, की राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारच्या वैधतेबाबतचा फैसला सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्याने राज्य सरकारच्या भवितव्यावर ही टांगती तलवारच आहे. सर्वोच्च न्यायालयाने नुकताच निवडणूक आयुक्तांची नियुक्ती सल्लागार समितीच्या शिफारशीनुसार करण्यात येईल असे आदेश दिल्याकडे लक्ष वेधताना यातून या न्यायालयाने केंद्र सरकारला फटकारले असल्याचे चव्हाण यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा >>> पोलिसांत फिर्याद दिल्याच्या रागापोटी बलात्कारित अल्पवयीन मुलीवर जीवघेणा हल्ला

विधानपरिषदेच्या शिक्षक, पदवीधर मतदारसंघातील निवडणुकांसह विधानसभेच्या कसबा पोटनिवडणुकीच्या निकालातून जनतेचा भाजपविरोधी कल दिसून आला, आणि असेच वातावरण देशभर पसरले आहे. महाविकास आघाडीच्या एकत्र ताकदीमुळे कसबा पोटनिवडणुकीत भाजपचा ३२ वर्षांनंतर पराभव झाला. त्यातून भाजपामधील धुसफूसही स्पष्ट झाली. या निकालाचा दूरगामी परिणाम दिसून येणार आहे. चिंचवडमधील अटीतटीच्या लढतीत ठाकरे गटाचे राहुल कलाटे यांची बंडखोरी झाली नसतीतर महाविकास आघाडीचा निश्चित विजय झाला असता असा विश्वास चव्हाण यांनी व्यक्त केला. येत्या निवडणुकातही हा महाविकास आघाडीच्या एकत्रित लढ्याचा प्रयोग करून जातीयवादी पक्षांना रोखणार आहोत. त्यासाठी ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उत्सुक असल्याचे चव्हाण यांनी सांगितले. 

हेही वाचा >>> अधिसभा निवडणुकीतही महाविकास आघाडी, अधिसभा निवडणुकीतही महाविकास आघाडीचे १० जागांसाठी ११ उमेदवार

महाविकास आघाडीचा कसब्यातील यशस्वी प्रयोग, सर्वोच्च न्यायालयाच्या प्रलंबित निर्णयामुळे शिंदे-फडणवीस सरकारला आपल्या वैधतेची शाश्वतीही नाही. तसेच राज्यकर्त्यांविरोधात वातावरण असल्यामुळेच राज्य सरकार महापालिका, पालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका टाळत आहेत. त्यातून लोकशाहीचा गळाच घोटला जात असल्याची टीका चव्हाण यांनी केली. काँग्रेसनेते राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेचा सकारात्मक परिणाम दिसतो आहे. आता ‘हाथ से हाथ जोडो’ अभियानातून भाजपविरोधी जनमत आणखी घट्ट होईल असाही विश्वास पृथ्वीराज चव्हाणांनी व्यक्त केला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-03-2023 at 20:06 IST
ताज्या बातम्या