रंगुनी रंगांत साऱ्या रंग माझा वेगळा!
गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा!

कोण जाणे कोठुनी ह्या सावल्या आल्या पुढे;
मी असा की लागती ह्या सावल्यांच्याही झळा!

मराठीत गझल हा प्रकार ज्यांनी रुजवला आणि वाढवला असे श्रेष्ठ गझलकार म्हणजे सुरेश भट. सुरेश भट यांनी लिहिलेली कविता, गझल, गाणी ही आजही आपल्याला आवडतात. सुरेश भट यांनी मराठी भाषेला दिलेलं सर्वात मोठं देणं म्हणजे मराठी अभिमान गीत. ‘लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी’ हे लिहिणाऱ्या कवीने ‘मलमली तारुण्य माझे’, ‘केव्हा तरी पहाटे’ अशी प्रेमगीतंही लिहिली. ‘सुन्या सुन्या मैफलीत माझ्या असेल’ किंवा ‘गंजल्या ओठास माझ्या धार वज्राची मिळू दे’ अशी अंतर्मुख करायला लावणारी गीतंही लिहिली. गझल हा साहित्य प्रकार मराठी भाषेत रुजवून मोठा करण्याचं सगळं श्रेय जातं ते सुरेश भट यांनाच.

सुरेश भट यांनी संगीत ऐकण्याची आवड कशी लागली?

सुरेश भट यांचा जन्म १५ एप्रिल १९३२ चा. वयाच्या अडीचाव्या वर्षी त्यांना पोलिओने ग्रासलं. त्यामुळे त्यांचा एक पाय अधू झाला. सुरेश भट यांचे वडील श्रीधर भट हे डॉक्टर होते. मात्र देखील यावर उपाय करु शकले नाहीत. परिणामी सुरेश भट यांचा उजवा पाय आयुष्यभरासाठी अधू झाला होता. सुरेश भट यांना त्यांच्या आईने संगीत ऐकण्याची गोडी लावली होती. त्या स्वतः हार्मोनियमही वाजवत असत. पाय अधू झाल्याने सुरेश भट मैदानी खेळ खेळू शकत नव्हते. त्यामुळे त्यांनी लाडक्या मुलाला पेटी आणली. त्यांच्या वडिलांनी मुलासाठी घरी ग्रामोफोन आणला. सुरेश भटांमधला कवी जन्माला येण्यास इथून सुरुवात झाली. सुरेश भट उत्तम बासरी वादक आणि उत्तम गायकही होते.

Suresh Bhat Birth Anniversary Special Article
सुरेश भट यांनी अनेक अजरामर ओळी लिहिल्या आहेत. (फोटो सौजन्य-सुरेश भट गझल, इन्स्टाग्राम)

वाचनाची आवड आईमुळे निर्माण झाली

सुरेश भट यांनी आकाशवाणीला दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं होतं की त्यांना वाचनाची आवड त्यांच्या आईमुळे निर्माण झाली. केशवसुत, गोविंदाग्रज, भा.रा. तांबे यांचं लिखाण लहान असताना वाचनात आलं. पोलिओची झाल्याने दोनदा शस्त्रक्रिया झाली होती. पायाला प्लास्टर असयाचं त्यामुळे वेळ मिळायचा. पण कविता नेमकी कशी सुचू लागली हे सांगता येणं कठीण आहे. कविताच तुम्हाला गाठते असं मला वाटतं, आपण अमुक व्यक्तीच्या प्रेमात कसे पडलो हे जसं सांगता येत नाही तसंच कवितेचं आहे. असं सुरेश भट यांनी म्हटलं होतं.

मी कवी याची सुरुवातीला खात्री नव्हती-सुरेश भट

मी कवी आहे याची सुरुवातीला मलाही खात्री नव्हती. मला वाटायचं मी गंमत करतो आहे. मी कवी म्हणून कविता लिहिल्या नाहीत. मला थ्रील वाटायचं, गंमत वाटायची म्हणून मी कविता लिहित असे. मला स्वतःलाही सुरुवातीला खात्री पटली नव्हती की मी कवी वगैरे आहे. आयुष्याची गंमत सुरु होती. १९५५ च्या सुमारास वगैरे जाणवू लागलं की मी कवी असेन. असंही सुरेश भट या मुलाखतीत म्हणाले होते. महाविद्यालयातून बाहेर पडणं आणि लग्न होणं या काळात जो काही सात आठ वर्षांचा काळ गेला त्यात वाटलं की मी खरंच वाटून गेलं मी कवी आहे.

मराठी माझी आई आहे, हिंदीत लिहिणार नाही असं मी मित्रांना सांगितलं होतं-सुरेश भट

‘जिवंत माझ्या कलेवराला, अजून आयुष्य हाक मारी! कशास एका भिकारड्याला पुकारतो हा दुजा भिकारी’ ही कविता सुरेश भट वयाच्या २४ व्या वर्षी वगैरे लिहिली आहे असं त्यांनी या मुलाखतीत सांगितलं होतं. मलमली तारुण्य माझे, मालवुनी टाक दीप हे मी त्याच वयात लिहिलं आहे. पण मालवून टाक दीप हे आठवल्यानंतर त्याची पुढच्या ओळी सुचायला आपल्याला तीन वर्षे लागली होती असाही किस्सा सुरेश भट यांनी सांगितला होता. रंगुनी रंगांत साऱ्या रंग माझा वेगळा! गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा! आपल्याला १९६७ ला सुचली होती. यातली दुसरी ओळ मला लागू पडते असंही सुरेश भट यांनी सांगितलं. मी लिहितो ते गझल आहे हे मला मित्रांनी सांगितलं होतं. माझे मुसलमान मित्र अनेक होते. मी सुरुवातीला उर्दू भाषेत लिहित होतो. मला माझे मित्रही म्हणाले होते की तू हिंदी किंवा उर्दूत का लिहित नाही त्यावेळी मी त्यांना सांगितलं होतं की मराठी माझी आई आहे आणि हिंदी मावशी अशी आठवणही सुरेश भट यांनी सांगितली होती.

एल्गार कवितासंग्रह म्हणजे शब्दांची लयलूट

सुरेश भटांचा एल्गार हा कवितासंग्रह म्हणजे तर शब्दांची लयलूट आहे यात काहीही शंका नाही. एल्गार ही कविता कालातीत तर आहेच, शिवाय ती कविता आपल्याला अस्वस्थ करुन जाते. गझल या प्रकारात साधारण पाच ते पंधरा कडवी असतात. प्रत्येक कडवं म्हणजे दोन ओळींचा शेर असतो. केवळ दोन ओळींमध्येच नाट्यमय म्हणता येईल अशी रचना करायची असते. सुरेश भट यांनी लिहिलेले शब्द असेच जादुई आहेत.

सारखे माझ्या स्मितांचे हुंदके सांभाळले मी
एकदा हसलो जरासा, मग पुन्हा हसलोच नाही

स्मरतही नाहीत मजला चेहरे माझ्या व्यथांचे
एवढे स्मरते मला की, मी मला स्मरलोच नाही

संपल्यावर खेळ माझ्या आंधळ्या कोशिंबिरीचा
लोक मज दिसले अचानक, मी कुठे दिसलोच नाही

Suresh Bhat Birth Anniversary Special Article
सुरेश भट यांनी मराठी भाषेबाबत त्यांच्या मित्रांना नेमकं काय सांगितलं होतं? (फोटो-सुरेश भट, गझल पेज, इन्स्टाग्राम)

पोलिओला शब्दांनी हरवणारा गझलकार

या आणि अशा अनेक अजरामर ओळी सुरेश भट यांनी लिहिल्या आहेत आणि त्या अजरामर केल्या आहेत. गझल सम्राट हे बिरुद त्यांच्यापुढे लागलं ते कायमचंच कारण गझल म्हटलं की सुरेश भट हेच नाव आजही आपल्या डोळ्यांसमोर येतं. पोलिओने पाय अधू केला पण त्याची तमा न बाळगता हा माणूस लिहिता राहिला आणि त्याने मराठी भाषेला जे देणं दिलं ते भरभरुन दिलं यात शंका नाही. एल्गार हा कवितासंग्रह खूप गाजला. “साध्याच माणसांचा एल्गार येत आहे, हा थोर गांडुळांचा भोंदू जमाव नाही.” असं म्हणत सुरेश भट यांनी वास्तवावर शाब्दिक कोरडे ओढले होते. त्यांच्या प्रतिभेचे अनेक पदर त्यांनी उलगडून दाखवले. एका मेफिलीत या नदीच्या पार तेथे ही गझल सादर केली होती.

या नदीच्या पार तेथे, एक माझे गाव होते
कोण जाणे हाय तेव्हा काय माझे नाव होते

तो कसा बाजार होता, ती कशी होती दुकाने
रक्त होते एक ज्याचे, वेगळाले भाव होते

प्राण जाताना दग्याचा मी कुठे आरोप केला
ओळखीच्या माणसांचे ओळखीचे घाव होते

राहिले आयुष्य कोठे लावण्यासाठी पणाला
घेतले जे श्वास तेही हारलेले डाव होते

अशा प्रकारच्या ओळी लिहिण्यात सुरेश भट यांची हातोटी होती. अंतर्मुख करणारे, विचार करायला भाग पाडणारे कवी सुरेश भट यांनी २००३ मध्ये जगाचा निरोप घेतला. मात्र त्यांनी लिहिलेल्या ओळी अजरामर होत्या, आहेत आणि आपल्याला प्रेरणा देत राहतील यात शंकाच नाही.