सोलापूर : सोलापूर जिल्ह्यासाठी मोठे वरदान मानल्या जाणा-या महाकाय उजनी धरणातील पाणीसाठा प्रचंड प्रमाणावर खालावत रसातळाला गेला आहे. त्यातच दुष्काळाचे संकट ओढवल्याच्या पार्श्वभूमीवर उजनीच्या काठावर जीवापाड जपलेली ऊस, केळी आदी नगदी पिके पाण्यावाचून सुकून चालली आहेत. ही पिके वाचविण्यासाठी शेतक-यांची मोठी केविलवाणी धडपड सुरू आहे.

उजनी लाभक्षेत्र म्हणून ओळखला जाणारा करमाळा तालुक्यातील कंदर ते कोंढार चिंचोली हा पट्टा केळी व ऊस बागायतीसाठी प्रसिद्ध आहे. कंदर, केडगाव, पांगरे, वांगी, दहिगाव, चिकलठाण, कुगाव, सोगाव, उमरड, मांजरगाव, उंदरगाव, वाशिंबे, पारेवाडी, केतूर, पोमलवाडी, खतगाव, टाकळी, कोंढार चिंचोली आदी गावांची त्यासाठी विशेष ओळख बनली आहे. परंतु यंदा उजनी धरणात केवळ ६०.६६ टक्के पाणीसाठा होऊ शकला होता. त्यात पुन्हा पाणीवाटपाचे नियोजन चुकल्यामुळे धरणातील पाणीसाठा वेगाने खालावला आहे. हिवाळ्यातच धरणातील पाणीसाठा वजा पातळीवर गेला असताना सध्याच्या तीव्र उन्हाळ्यात धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाणी पातळी नेहमीपेक्षा पाच ते सहा किलोमीटर लांब जात आहे. कृषी पंपांच्या मोटारींसाठी इतक्या दूरपर्यंत वीज पुरवठा करणे शक्य नसल्याने आणि पाणी पातळी दूर गेल्यामुळे या भागातील शेतकरी वर्गणी करून पोकलेनच्या साह्याने साधारणतः २० फूट रुंदीच्या आणि १५ फूट खोलीच्या चाऱ्या पाडून विद्युत मोटारींपर्यंत पाणी आणण्यासाठी धडपड करताना दिसत आहेत.

हेही वाचा >>>सोलापूर: उजनी धरणातील गाळ काढण्यासाठी समितीचा सकारात्मक अहवाल

पाणी टंचाईमुळे सुमारे ५० टक्के पिके यापूर्वीच करपून गेली आहेत. त्यात अलिकडे झालेल्याआवकाळी पावसासह  वादळी वाऱ्यात घडांनी लगडलेली केळी भुईसपाट झाल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. या उपरही उमेद न सोडता या भागातील शेतकरी चाऱ्यांतून आलेले पाणी पिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी दिवसभर पाईप, मोटर, स्टार्टर, केबल आदींची जुळवाजुळव करताना दिसत आहे.

पाणी वाटपाचा खेळखंडोबा

गतवर्षी केवळ उजनी धरण केवळ ६० टक्के भरलेले असताना काटेकोर, पारदर्शी नियोजन होणे आवश्यक होते. पण राजकारण्यांची बटीक बनलेल्या प्रशासनाने गरज नसताना पाणी वाटपाचा खेळखंडोबा  केला आहे. कालवा सल्लागार समितीचे करमाळ्यातील सदस्य मूग गिळून गप्प बसले. यामुळेच आता ही गंभीर परस्थिती उद्भवली आहे.-प्रा. शिवाजीराव बंडगर,अध्यक्ष, उजनी धरण संघर्ष समिती, करमाळा

चुकीच्या नियोजनाचा फटका

उजनी धरणात जमिनी गेलेले शेतकरी उजनीच्या पाण्याचे प्राधान्यक्रमाने हक्कदार आहेत. मात्र धरणातून पाणी वाटपाच्या चुकीच्या  नियोजनामुळे पावसाळ्यात सुद्धा गरज नसताना इतर भागात आवर्तने सोडली गेली. त्यामुळे उन्हाळ्यात पाणी पातळी घटते आणि लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांसमोर पाणी मिळण्यासाठी अडचणी निर्माण होतात.-संभाजी रिटे,ऊस उत्पादक शेतकरी, रिटेवाडी