कराड : हवामान विभागाने काल शनिवारी व आज रविवारी अतिवृष्टीचा इशारा दिल्याने विशेषतः कराड, सांगली व कोल्हापूर शहरांसह कृष्णा, कोयना, वारणा, पंचगंगा नद्यांकाठी पूर, महापुराची धास्ती लागून राहिली. परंतु, अतिवृष्टीचा इशारा दुसऱ्या दिवशीही फोल ठरल्याने पूर, महापूर भयग्रस्तांना दिलासा मिळाला आहे. पश्चिम घाटासह कोयना पाणलोटातील मुसळधार गेल्या ७२ तासांत ओसरली आहे. त्यामुळे कोयना धरणातील जलआवक घटली आहे. सध्या धरणाचे पायथा वीजगृह व दरवाजातून कोयना नदीपात्रात होणारा विसर्ग हा आवक पाण्यापेक्षा ४,७६४ घनफुटाने (क्युसेक) ज्यादाचा आहे. त्यामुळे धरणसाठा गेल्या दोन दिवसांत ०.१५ अब्ज घनफुटांनी घटून स्थिर राहिला आहे. नद्यांच्या पाणीपातळीतही अल्पशी घट सुरु झाल्याने महापुराचा विळखा असलेल्या सांगली, कोल्हापुरकरांना दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत. पावसाळ्याचा निम्मा कालावधी शिल्लक असताना, पश्चिम महाराष्ट्रात आजवर वार्षिक सरासरीच्या ७५ टक्क्यांहून अधिकचा पाऊस झाल्याने जलाशयं आताच भरून वाहू लागली आहेत. पंधरवड्यातील जोरदार पाऊस आणि कोयनेसह अन्य धरणांमधील जलविसर्गामुळे कोल्हापूर, सांगलीला पुराचा विळखा पडला, नद्यांच्या तीरावरील जमिनी पाण्याखाली गेल्या, अतिपावसामुळे जमिनी उफाळू लागल्या, जोम धरणारी खरिपाची रोपे पिवळी पडू लागली आहेत. सततच्या पावसाचा बाजारपेठांवर परिणाम झाल्याचे चित्र आहे. अशातच सलग दोन दिवस अतिवृष्टीचे संकेत मिळाले. मात्र, या दोन्ही दिवशी पाऊस वाढण्याऐवजी घटला हे विशेष. हेही वाचा >>>उजनी धरण शंभरीच्या दिशेने, भीमा नदीत धरणातून पाणी सोडले; पंढरीत पुराचा धोका कोयनेचा जलविसर्ग सहा वक्री दरवाजे साडेदहा फुटांपर्यंत उचलून ५२ हजार १०० घनफूट (क्युसेक) करण्यात आला आहे. तर, दुसरीकडे गेल्या ४८ तासांत धरणातील जलआवक ५२ हजार ७४ घनफुटांवरून ४७ हजार ३३६ घनफुटांपर्यंत कमी झाली मात्र, अजूनही अतिवृष्टीच्या इशाऱ्याची चिंता राहणार आहे. कोयना पाणलोटक्षेत्रात रविवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत गेल्या २४ तासात कोयनानगराला १५०, नवजाला ११८ तर, महाबळेश्वराला २३० मिलीमीटर असा सरासरी १६६ मिलीमीटर पाऊस झाला आहे. कोयना पाणलोटात आजवर एकूण ४,४६२.३३ मिलीमीटर (वार्षिक सरासरीच्या ८९.२४ टक्के) असा भरघोस पाऊस झाला आहे. सध्या कोयनेचा जलसाठा काल शनिवार एवढाच ८६.६३ अब्ज घनफूट अर्थात टीएमसी (धरण क्षमतेच्या ८२.४५ टक्के) असून, गेल्या ४८ तासात तो ०.१५ अब्ज घनफुटांनी घटला आहे. रविवारी दिवसभरात कुंभी धरणक्षेत्रात १६ मिलीमीटर, दूधगंगा ३१, वारणा २८, धोम-बलकवडी ४६, कास ४५, ठोसेघर धबधबा २४, कडवी २०, उरमोडी १६, धोम ३२, मोरणा २ व नागेवाडी १२ मिलीमीटर असा जलाशय परिसरातील पाऊस आहे. अन्यत्र, सर्वाधिक ८५ मिलीमीटर पाऊस जोर येथे झाला. सोनाट येथे ६५, दाजीपूरला ४६, मोळेश्वरीला ६१, प्रतापगडला ७२, पाथरपुंज ७१, पाडळी येथे ४४ मिलीमीटर पावसाची नोंद आहे.