महाराष्ट्राचे लाडके नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं २८ जानेवारीला विमान अपघातात निधन झालं. ज्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र हळहळला. काही दिवसांपूर्वी बारामतीत अजित पवार यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचंही अनावरण करण्यात आलं. अजित पवार यांच्या भाची असलेल्या दिप्ती घाटगे यांनी अजित पवारांच्या म्हणजेच त्यांच्या लाडक्या अजित मामांच्या आठवणी सांगितल्या आहेत. दिप्ती घाटगे या अजितमामांच्या आठवणी सांगताना भावूक झाल्याचं पाहण्यास मिळालं.
दिप्ती घाटगे यांनी काय सांगितलं?
अजितमामांना माझ्याकडून कायमच गृहीत धरलं जायचं. मी कधीही त्यांचा एकट्याचा फोटो मी कधीच घेतला नव्हता. मागच्या दिवाळीत भारतीकाकी नव्हत्या त्यामुळे ती दिवाळी सगळे एकत्र येऊन साजरी करणार नव्हते. मग मी तेव्हा विचार केला की बारामतीला नको जायला. त्यावेळी इतरही कामं होती. पण दिवाळी आणि मामा हे एकदम घट्ट नातं आहे, असं दिप्ती घाटगे म्हणाल्या.
मागच्या दिवाळीतला तो प्रसंग काय होता?
मागच्या वर्षी दिवाळीच्या दरम्यान मी अजितमामांचे पीए चौबे यांना विचारलं की अजितमामा कधी असतील पुण्यात? तर त्यांनी सांगितलं उद्या आहेत. मी वेळेच्या आधी गेले होते, तिथे अजितमामा दिलेल्या वेळेच्या १५ ते २० मिनिटं आधीच आले होते. तिथे पोलिसांचा एक कार्यक्रम होता तिथे तुमची भेट होईल आणि तुम्ही गाडीने त्यांच्यासह जाऊ शकाल. मला वाटलं अजितमामा नेहमीसारखे येतील. पण मला खूपच वाईट वाटलं पाहून, कारण अजितमामांना बरं नव्हतं. मी त्यांना पाहिलं तेव्हा मला जाणवणं की अजितमामांना खूप जास्त बरं नव्हतं. असं मी अजितमामांना कधीही पाहिलं नव्हतं. त्यांना आजारी पाहिलं नव्हतं. अजितदादा आले, अतिशय हळू चालत होते. शांतपणे चालत होते आणि डायसकडे आले तिथे जो कार्यक्रम होता तिथे भाषण केलं आणि परत जायला निघाले. मी त्यांच्या आवडीचे डिंकाचे लाडू केले होते मी त्यांना दिले. त्यांना सांगितलं मामा तुमच्यासाठी लाडू मी केलेत. मला म्हणाले माझ्याकडेच डबा दे. मला ते जवळ घ्यायला निघाले तेव्हा त्यांना खोकल्याची उबळ आली. त्यांचा खोकला थांबत नव्हता. त्यादिवशी त्यांना तापही होता. कारण ते कसेबसे ते गाडीकडे गेले. थोडा आधार देत ते तिथे थांबून होते. माझ्यासाठी तो प्रसंग खूपच वाईट वाटणारा होता. मी आजीला आणि आईलाही फोन केला अशी आठवण दिप्ती घाटगे यांनी सांगितली. एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत दिप्ती घाटगे यांनी ही आठवण सांगितली.
अजितमामा आजारी होते तरीही विश्रांती फार न घेता काम करत होते-दिप्ती घाटगे
अजित मामांचा तो संयम आणि घड्याळ्याच्या काट्याप्रमाणे वेळ पाळण्याचा त्यांचा स्वभाव मला तिथे दिसून आला. आजारी होते तरीही ते कार्यक्रमाला वेळेवर आले होते. मी त्या दिवशी त्यांच्या बरोबर कारने गेले नाही. मी आजीला नंतर सांगितलं की मामांना सांग तुम्ही काळजी घ्या स्वतःची, कारण तुम्ही अव्याहतपणे काम करताय पण तब्बेतीकडेही बघा. पण काठेवाडीला गेल्यावर अर्धा दिवस वगैरेच विश्रांती घेतली पण पूर्णपणे विश्रांती घेतली नाही. लोकांची भेट घेतली. कामं केली. अजूनही वाटतं की ते कुठेतरी दौऱ्यावर असतील. टीव्हीवर त्यांची बातमी दिसेल. अजूनही वाटतं की ते कुठेतरी आहेत आणि त्यांचं काम करत आहेत. आम्ही जे काही घडलं आहे स्वीकारलं आहे पण मनाला हे पटवून द्यावं लागतं आहे की हे झालंय, यातून बाहेर येणं शक्य नाही, जे घडलंय त्या सत्यासोबतच जगायचं आहे. जे काही घडलं ते कुणालाच न पटण्यासारखं नाही. त्यांचा सहवास नाही, त्यांना पाहणं नाही, २२ जुलैला त्यांची भेट नाही हे पटण्यासारखं आहे. स्वर्गीय हा शब्द अजितदादांबाबत कानाला आणि हृदयाला खटकतो. आत्ताचे त्यांचे होर्डिंग्ज पाहवत नाहीत, त्याबाबत शब्दच नाहीत, असंही दिप्ती घाटगे यांनी सांगितलं.
