राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी आज पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेबाबत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनावर भाष्य केलं. तसंच पत्रकार परिषदेत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बाईक प्रवासावर भाष्य केलं. तसंच राहुल गांधींवर मुख्यमंत्र्यांनी जी टीका केली होती त्यावरही तीव्र नाराजी व्यक्त करत त्यांना सल्ला दिला आहे.

राहुल गांधींबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वापरलेले शब्द योग्य नाहीत-पवार

आज सकाळपासून मी पाहतोय कुणी मोटरसायकलवरुन जातोय, कुणी चालत ऑफिसला जातो आहे. एका मंत्र्याने जाहीर केलं आहे की मी मंत्री आहे पण मी कार कमी केल्या. सतरा कार होत्या त्यावरुन आम्ही आठवर आलो आहेत. मुळात १७ कार का होत्या? हे मला कळलं नाही. १७ कार त्यांनी ८ वर आणल्या याचा अर्थ स्थिती गंभीर आहे. सगळ्यांनीच एकमेकांना सहकार्य करावं. मी हे सांगतो आहे त्यावेळी मुख्यमंत्री आणि अन्य घटकांनीही आपली भाषा ही लोकांनी यात सहभागी व्हावं यासाठी पोषक असली पाहिजे. राहुल गांधींच्या संबंधी मुख्यमंत्र्यांनी जे शब्द वापरले ते मला अयोग्य वाटले. राहुल गांधी हे संसदेत विरोधी पक्षनेते आहेत. विरोधी पक्षनेता हे घटनात्मक पद आहे आणि लोकसभेचं पद आहे. त्यामुळे त्यांच्याबाबत अशा पद्धतीने बोलणं योग्य नाही असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.

What Shard Pawar Said?
शरद पवार यांनी काय काय मुद्दे मांडले आहेत? (फोटो-शरद पवार, फेसबुक पेज)

देवेंद्र फडणवीस रोज मोटरसायकलवर आले तर लोक त्यांना गांभीर्याने घेतील-पवार

आज मी पाहिलं की देवेंद्र फडणवीस हे मंत्रालयात मोटरसायकलवर आले. उद्यापासून ते रोज मोटरसायकलवर आले तर लोक त्यांना अधिक गांभीर्याने घेतील. ताफा ज्या मंत्र्यांनी कमी केला आहे त्यांनी त्याचा देखावा करु नये त्यात सातत्य ठेवावं. माझ्या ताफ्यामध्ये तीन कार होत्या. मी गेली तीन ते चार वर्षे अशाच पद्धतीने प्रवास करतो आहे. आता ज्या कार आहेत, त्यातही काही कमतरता करु शकतो का? याचा विचार आम्ही करतो आहोत असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.

Devendra Fadnavis on Bike news
देवेंद्र फडणवीस यांनी बुलेटवरुन प्रवास करत मंत्रालय गाठलं. त्यांच्यासह आशिष शेलारही होते. (फोटो-देवेंद्र फडणवीस-एक्स पेज)

राहुल गांधींबाबत काय म्हटलं होतं देवेंद्र फडणवीस यांनी?

मध्यपूर्वेतील सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील लोकांना सोने, पेट्रोल, डिझेल, खाद्यतेल आणि खते यांची बचत करण्याचे आणि परदेश प्रवास टाळण्याचे आवाहन केले आहे. हैदराबादहून पंतप्रधान मोदींनी देशाला केलेल्या या आवाहनामुळे राजकीय वातावरण तापले आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधानांच्या या आवाहनाला विरोध करत, हे जनतेसाठी केवळ एक सूचना नसून सरकारच्या अपयशाचा पुरावा असल्याचे म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनाला राहुल गांधींनी केलेल्या विरोधानंतर आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठे निवेदन जारी केले आहे. राहुल गांधींना ‘रिजेक्टेड माल’ संबोधून त्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. “लोकशाहीत, लोक काय स्वीकारतात हेच महत्त्वाचे असते.”

देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांबाबत काय म्हटलंय?

इंधनकपातीचा सल्ला देणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करणाऱ्या विरोधी पक्षांना देवेंद्र फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “विरोधी पक्षाला थोडी प्रगल्भता यावी लागेल. जगातले सगळे देश ज्यावेळी यापेक्षा कठोर निर्णय घेत आहेत, तेव्हा आपल्याला पंतप्रधानांनी थोडासा त्याग करायला सांगितला आहे. कोणतेही कठोर निर्णय घेतलेले नाहीत. त्यावर इतका गदारोळ करणं योग्य नाही. यापूर्वी इंदिरा गांधी असतानाही हे झालं आहे. नरसिंहराव यांचं सरकार असतानाही अशाच उपाययोजना करण्यात आल्या होत्या. चिदम्बरम अर्थमंत्री असतानादेखील २०१२ साली अशा प्रकारची पावलं उचलण्यात आली होती. त्यामुळे असं दुटप्पी वागणं योग्य नाही”, असं ते म्हणाले.

पंतप्रधानांवर टीका करणारे बिनडोक-फडणवीस

फडणवीसांना माध्यम प्रतिनिधींनी सोशल मीडियावर खुद्द पंतप्रधान विदेश दौऱ्यावर जात असल्याचा मुद्दा उपस्थित केला जात असल्याबाबत विचारणा केली. तेव्हा फडणवीसांनी अशा लोकांना ‘बिनडोक’ म्हटलं. “देशाच्या पंतप्रधानांच्या दौऱ्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करणं यापेक्षा जास्त मूर्खपणाचं दुसरं लक्षणच असू शकत नाही. देशाचे पंतप्रधान जेव्हा परदेशात जातात, धोरणात्मक करार होतात, देशाच्या अर्थव्यवस्थेला त्याचा फायदा होतो. त्यामुळेच पंतप्रधानांनी सांगताना अनावश्यक किंवा टाळता येण्यासारखे विदेश प्रवास न करण्याचं आवाहन केलं आहे. याचा अर्थ असा नाही की कुणी मोठा व्यापारी विदेशात एखादा करार करत असेल तर त्यानं तो करार रद्द करावा असा याचा अर्थ नाही. त्यामुळे जे पंतप्रधानांवर अशी टीका करत आहेत, ते बिनडोक आहेत” असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.