राजकारणामुळे लोकहिताच्या कामाला ब्रेक, महाविद्यालयाचे भवितव्य अडचणीत येण्याची शक्यता
अलिबाग : अलिबाग येथील उसर येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात भूमिपूजन करण्यात आले होते. मात्र भूमिपूजन होऊन वर्ष होत आले तरी महाविद्यालयाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात होऊ शकलेली नाही. राजकारणामुळे या महत्त्वाकांक्षी जनहिताच्या प्रकल्पाला ब्रेक लागल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. त्यामुळे महाविद्यालयाचे भवितव्य अडचणीत येण्याची शक्यता आहे.
शासकीय अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेनी अलिबाग येथे गेल्या वर्षीपासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यास मंजुरी दिली आहे. त्यानुसार आरसीएफ कुरूळ येथील वसाहतील तात्पुरत्या स्वरुपात यावर्षीपासून १०० विद्यार्थी क्षमतेचे वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाले आहे.
महाविद्यालय आणि ५०० खाटांच्या रुग्णालयासाठी अलिबाग तालुक्यातील उसर येथील ५३ एकर जागा हस्तांतरीत करण्यात आली आहे. या जागेवर वैद्यकीय महाविद्यालयाची प्रशासकीय इमारत आणि ५०० खाटांचे सर्वोपचार रुग्णालयाची इमारत बांधली जाणार आहे. यासाठी साडे चारशे कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून पहिल्या टप्प्यातील कामासाठी निधीही उपलब्ध झाला आहे. या कामाचा भूमिपुजन समारंभ गेल्या वर्षी २२ फेब्रुवारी २०२२ रोजी पार पडला होता. मात्र भुमिपुजन समारंभाला एक वर्ष पुर्ण होत आले तरी प्रत्यक्ष कामाला सुरुवात होऊ शकलेली नाही.
राज्यातील सत्तासंघर्षांनंतर या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे काम ठप्प झाल्याचे पहायला मिळत आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात अदिती तटकरे यांनी पाठपुरावा करून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करून घेतले होते. वैद्यकीय महाविद्यालयाबरोबच याच परिसरात दंतचिकित्सा महाविद्याल आणि नर्सिग महाविद्यालय आणण्यासाठी हालचाली सुरू झाल्या होत्या. वैद्यकीय महाविद्यालय आणि ५०० खाटांच्या रुग्णालयाचे काम हे तीन वर्षांत ही कामे पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र सत्ता बदल होताच वैद्यकीय महाविद्यालयाच्या कामाला ब्रेक लागला आहे.
सत्ता बदल होताच स्थानिकांचा विरोध असल्याचे कारण पुढे करत महाविद्यालयाच्या जागेवर संरक्षक भिंत उभारणीच्या कामाला स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे वैद्यकीय महाविद्यालयाचे भवितव्य अडचणीत येण्याची शक्यता आहे. आरसीएफ प्रशासनाने वैद्यकीय महाविद्यालयासाठी तात्पुरत्या स्वरूपात इमारती उपलब्ध करून दिल्या आहेत. तर अलिबाग येथील जिल्हा रुग्णालय तीन वर्षांच्या कालावधीसाठी अलिबागच्या वैद्यकीय महाविद्यालयाला तीन वर्षांसाठी सलग्न करण्यात आले आहे. ही मुदत संपण्यापुर्वी महाविद्यालयाच्या रुग्णालयाची नवीन इमारत तयार होणे गरजेचे आहे.
अलिबाग येथील वैद्यकीय महाविद्यालयात सध्या १०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. पुढील शैक्षणिक वर्षांत आणखीन १०० विद्याथ्र्यी महाविद्यालयात दाखल होणार आहे. त्यामुळे सध्याची व्यवस्था अपुरी पडू शकणार आहे. ही बाब लक्षात राज्य सरकारने या प्रकल्पाला तातडीने गती देणे आवश्यक आहे.
महाविद्यालयाच्या कामात कोणी राजकारण आणू नये. अनेक अडचणीवर मात करून जिल्ह्यासाठी वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करून घेतले आहे. त्यासाठी लागणारा निधीही उपलब्ध आहे. संपूर्ण जागा शासनाच्या ताब्यात आहे. त्यामुळे कामात कुठलीही अडचण नाही. महाविद्यालयाचा आणि या ठिकाणी उभारल्या जाणाऱ्या रुग्णालयाचा सर्वाधिक फायदा स्थानिकांनाच होणार आहे. त्यामुळे हे काम तातडीने मार्गी लावणे गरजेचे आहे.- आदिती तटकरे, आमदार