पुतण्याच्या हॉटेलमध्ये चोरी; रवी पाटील यांच्यावर गुन्हा

स्वत:च्या पुतण्याच्या बंद हॉटेलमधून फर्निचरसह इतर सामान परस्पर चोरून नेल्याप्रकरणी कर्नाटकातील इंडीचे माजी आमदार रवी पाटील यांच्यासह चौघा जणांविरुद्ध सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

स्वत:च्या पुतण्याच्या बंद हॉटेलमधून फर्निचरसह इतर सामान परस्पर चोरून नेल्याप्रकरणी कर्नाटकातील इंडीचे माजी आमदार रवी पाटील यांच्यासह चौघा जणांविरुद्ध सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
शहरातील रेल्वे लाइन्समध्ये जीवन महाल चौकात रवी पाटील यांचे पुतणे उदयशंकर पाटील यांच्या मालकीचे हॉटेल प्रिन्स बार असून ते सध्या बंद आहे. परंतु या बंद हॉटेलमधून सोफासेट, वीस लाकडी टेबल, दोन सनलाइट काउंटर तसेच स्टील भांडी, ग्लास व रोकड असे एकूण ३५ हजार रुपये किमतीचे सामान रवी पाटील यांच्यासह गुरू कावडे, मल्लिनाथ हब्बू व राजू पसारे यांनी परस्पर चोरून नेल्याची फिर्याद उदयशंकर पाटील यांचे मुनीम रमेश शिवपुत्र कलशेट्टी यांनी सदर बझार पोलीस ठाण्यात नोंदविली आहे.
सोलापुरात बरेच प्रस्थ वाढविलेले रवी पाटील हे कर्नाटकातील इंडी येथून तीन वेळा आमदार म्हणून निवडून गेले होते. राजकारणात पदार्पण करण्यापूर्वी सोलापूरच्या ‘अंडरवर्ल्ड’मध्ये कार्यरत होते. अलीकडे त्यांनी काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे यांच्याबरोबर वितुष्ट आले असता त्यांचे पुतणे उदयशंकर पाटील हे शिंदे यांचे अनुयायी झाले. या पाश्र्वभूमीवर अधूनमधून उभयतांमध्ये वाद निर्माण होऊन त्याचे पर्यावसान फौजदारी गुन्हे दाखल करण्यापर्यंत होत असल्याचे दिसून येते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Theft in hotel of niece crime against ravi patil

ताज्या बातम्या