महसूलमंत्र्यांच्या आदेशामुळे कापूरवाडी परिसरातील तब्बल आठ क्रशर चालकांविरुद्ध अखेर महसूल विभागाने बेकायदा गौण खनिज उत्खननाबद्दल भिंगारच्या कँप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. या क्रशरचालकांनी जमीन मालक येथे रहात नसल्याचे पाहून त्याच्या जागेतील टेकडीचे क्रशरसाठी २७ हजार ३११.५२३ ब्रास दगडाचे बेकायदा उत्खनन करून चोरी केली तसेच करासहित तब्बल २५ कोटी ९४ लाख ५९ हजार ४६८ रुपयांचे नुकसान केल्याचा आरोप आहे. मिरावलीबाबा पहाड परिसरातील डोंगरावर हे बेकायदा उत्खणन करण्यात आले आहे. जमीन मालकाने यापूर्वी स्थानिक महसूल अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती, परंतु त्याची दखल घेतली गेली नव्हती.
यासंदर्भात मंडलाधिकारी रामनाथ केरू सूर्यवंशी यांनी काल, शनिवारी कँप पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यानुसार तुकाराम त्र्यंबक दुसुंगे, विजय दिगंबर दुसुंगे, महादेव दगाजी दुसुंगे, दत्तु दगाजी दुसुंगे, नंदु किसन दुसुंगे, मिनीनाथ एकनाथ दुसुंगे, बापू भिकाजी मगर यांची मुले, परसराम पर्वती भगत यांची मुले विजय व बलभीम यांच्याविरुद्ध चोरी व कर बुडवल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल केला आहे. यातील तिघेच परवानाधारक क्रशर चालक आहेत.
यासंदर्भात पोलीस व महसूल विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार जमीनमालक हरिभाऊ माधव भिंगारदिवे ठाणे महापालिकेत नोकरी करतात व मानपाडा भागात रहातात. त्यांच्या आजोबांना १९४४ मध्ये कापूरवाडी परिसरात सर्वे क्रमांक २६९ मध्ये जमीन मिळाली होती. भिंगारपासून ७ किमी अंतरावर ही जमीन आहे. या जमिनीतील टेकडीवर बेकायदा उत्खणन होत असल्याचे पाच ठिकाणच्या खोल खड्डय़ांवरून त्यांच्या निदर्शनास आल्यावर, त्यांनी स्थानिक अधिकाऱ्यांकडे तक्रार केली, मात्र त्याची दखल घेतली गेली नाही. त्यामुळे भिंगारदिवे यांनी महसूलमंत्र्यांकडे तक्रार केली.
त्याची चौकशी अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आली होती. या आदेशामुळे अखेर स्थानिक महसूल अधिकारी कारवाईसाठी राजी झाले. त्यानंतर महसूल विभागाने पंचनामे केले, पुण्यातील संस्थेकडून किती उत्खनन करण्यात आले, याची तंत्राद्वारे माहिती घेण्यात आली. त्यानुसार २७ हजार ३११.५२३ ब्रास उत्खनन करण्यात आल्याचे निष्पन्न झाले, त्यासाठी महसूल विभागाने ९५० रुपये प्रति ब्रास असा दर लावला आहे, यावरील करासहितची किंमत २५ कोटी ९४ लाख रुपये होत आहे.
यासंदर्भात अद्याप पोलिसांनी कोणाला अटक केलेली नाही. अधिक तपास सहायक निरीक्षक अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक जी. बी. जावळे करत आहेत.