पत्ता विचारण्याच्या बहाण्याने आलेल्या दोन परदेशी नागरीकांनी भात खरेदी-विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यास गंडा घातल्याची बाब समोर आली आहे. रायगड जिल्ह्यातील माणगाव रेपोली येथे ही घटना घडली. महत्वाची बाब म्हणजे हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. याप्रकरणी गोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरु आहे.

अतिथी देवो भव ही आपली संस्कृती आहे. त्यामुळे घरी एखादा परदेशी पाहुणा आलाच, तर त्याच्याकडे कोणी पटकन संशयी नजरेने बघणार नाही. मात्र माणगाव रेपोली येथील भात खरेदी-विक्री कऱणाऱ्या व्यापाऱ्याला नेमकी हीच गोष्ट भोवली. वासुदेव जांभरे असे या व्यापाऱ्याचे नाव आहे. मुंबई-गोवा महामार्गावर त्यांचे मुख्य रस्त्यालगत दुकान आहे. रविवारी सकाळी दोन परदेशी नागरिक पत्ता विचारण्याच्या बहाण्याने त्यांच्याकडे आले. त्यानंतर त्यांनी दोन हजार रुपयांची नोट देत, सुट्टे पैसे देण्याची मागणी केली. जांभरे यांनी त्यांना मदतीची तयारी दर्शवली. दरम्यान एकाने त्यांना बोलण्यात गुतंवले व संधी साधत दुसऱ्याने दुकानाचा गल्ला साफ केला. नंतर दोघेही पसार झाले. थोड्यावेळाने जांभरे यांना दुकानाच्या गल्ल्यातील सर्व रक्कम चोरीला गेल्याचे लक्षात आले.

परदेशी पाहुणे चोरी कशाला करतील अशी भाबडी आशा त्यांना होती. मात्र जेव्हा दुकानातील सीसीटिव्ही कॅमेऱ्यांनी केलेली चित्रफीत त्यांनी तपासली. तेव्हा हे दोघेच चोरटे असल्याचे त्यांच्या लक्षात आले. दुकानाच्या गल्ल्यातून ३५ हजार रुपयांची रोकड त्यांनी लंपास केल्याचे दिसून आले. यानंतर सीसीटीव्हीचे फुटेज घेऊन त्यांनी थेट गोरेगाव पोलीस ठाण्यात धाव घेतली व या परदेशी पर्यटकांविरोधात गुन्हा दाखल केला. या दोघांचा तपास सुरु आहे. वर्षभरापुर्वी लोणेरे येथे अशीच घटना घडली होती.