प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी काल (२ जुलै) त्यांच्या कर्जत येथील एन. डी. स्टुडिओमध्ये आत्महत्या केली. २००५ साली बांधलेला हा स्टुडिओ अत्यंत भव्यदिव्य आणि आकर्षक होता. मराठीसह अनेक बॉलिवूडच्या प्रसिद्ध चित्रपटांचेही चित्रिकरण या स्टुडिओमध्ये झाले होते. परंतु, या स्टुडिओचा आर्थिक भार सोसवू न शकल्याने नितीन देसाई यांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या स्टुडिओवर जप्ती येण्याएवजी येथे चित्रनगरी तयार करा, असं त्यांच्या व्हॉईस नोटमध्ये असल्याचं प्रसिद्धी माध्यमातून समोर येत आहे. यावरून, संजय राऊतांनीही मोठी मागणी केली आहे.
“नितीन देसाईंसारखा कला दिग्दर्शक हिंदी आणि मराठी सिनेसृष्टीत स्वतःच्या कर्तृत्वावर हिंमतीने उभा राहिला. या देशातील उत्तम असा कला स्टुडिओ एन. डी स्टुडिओ कर्जत येथे उभा केला. त्यांनी अनेक चित्रपटांची निर्मिती केली. अशा या महान कलाकाराचा मृत्यू झाला, त्याला मृत्यूला कवटाळावं लागलं, असं संजय राऊत म्हणाले.
“एनडी स्टुडिओ नितीन देसाईंचं स्वप्न, मराठी माणसाचं स्वप्न होतं. महाराष्ट्रात तुम्ही नव्या चित्रनगरीची योजना आखत असाल तर कर्जतच्या स्टुडिओलाच चित्रनगरीचा दर्जा द्या”, अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे. आज माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ही मागणी केली आहे.
शे-दीडशे कोटींचं कर्ज फेडता न आल्याने…
“एका बाजूला हजारो कोट्यवधी रुपये घेऊन लोक देशातून पळत आहेत. बँकांना बुडवताहेत, भाजपासोबत असणाऱ्यांना कर्जमाफी केली जाते. त्यांच्यावर कारवायाच होत नाहीत. पण हरहुन्नरी मराठी माणूस मात्र शे-दीडशे (कोटी) रुपयांचं कर्ज फेडू शकला नाही. जे स्वप्न एनडी स्टुडिओच्या माध्यमातून उभं केलं ते स्वप्न विखुरताना दिसतंय, हा स्टुडिओ कोणीतरी जप्त करेल हे सहन न झाल्याने त्यांनी आत्महत्या केली, असं संजय राऊत म्हणाले.