शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडाच्यामागे भारतीय जनता पार्टीच असल्याचं मत शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे. राज्यामध्ये निर्माण झालेल्या सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर यशंवतराव चव्हाण सेंटरमध्ये शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांची बैठक घेतली. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना शरद पवारांनी एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांसाठी सर्व सुविधा पुरवण्यामागे भाजपाचा हात असल्याचं म्हटलं आहे.

तसेच बंडखोर आमदारांना इथे यावेच लागेल, राज्यपालांच्या समोर किंवा विधानसभेत तरी त्यांना यावेच लागेल. विधानसभेच्या प्रांगणात आल्यानंतर मला माहीत नाही की आसाम, गुजरातमधील भाजपाचे नेते इथे येऊन, त्यांना मार्गदर्शन करू शकतील, असंही शरद पवार म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यावरून केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते नारायण राणे यांनी धमकीवजा इशारा दिला आहे.

शरद पवार यांच्या पत्रकार परिषदेनंतर नारायण राणे यांनी एक ट्वीट केलं आहे. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं की, “शरद पवार ‘सभागृहात येऊन दाखवा’ अशा धमक्या या सर्वांना देत आहेत. ते सभागृहात येणार आणि त्यांच्या मनाप्रमाणे मतदान करणार. त्यांच्या केसालाही धक्का लावल्यास घर गाठणं कठिण होईल.”

शरद पवार काय म्हणाले?
एकनाथ शिंदेंच्या बंडामागे भाजपा असल्याचं वाटत नाही, अजित पवारांच्या या विधानाबाबत विचारलं असता, शरद पवार म्हणाले की, “अजित पवार यांनी फक्त मुंबईमधील परिस्थिती पाहून वक्तव्य केलेलं असावं. त्यांना राज्याबाहेरची परिस्थिती माहिती नाही. ती आम्हाला माहीत आहे,” असं उत्तर त्यांनी दिलं. पुढे बोलताना शरद पवार म्हणाले, “आपण एकनाथ शिंदेचा एका व्हिडीओ पाहिला ज्यामध्ये त्यांनी आम्हाला एका राष्ट्रीय पक्षाचा पाठिंबा आहे असं सांगितलं,” असंही ते म्हणाले.