शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे आज कोकण दौऱ्यावर होते. बारसूत प्रस्तावित असलेला रिफायनरी प्रकल्पाच्या ठिकाणी आज त्यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी कठोर भूमिका जाहीर केली. यावरून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी त्यांच्यावर आगपाखड केली आहे. “स्वतःला दिर्घकाळ चालता येत नाही. कोणावर हात वर करू शकत नाहीत. तरीही पेटवूची भाषा का बोलतात हे कळत नाही”, असं ते म्हणाले.

“बारसूत प्रस्तावित जागेत ठाकरे पोहोचले, त्यानंतर ते सोलगावला गेले. नंतर काही लोकांना भेटले. सभा कुठेही झाली नाही. त्यांच्या सभेला परवानगी नाकारली त्यामुळे मी माझा दौरा रद्द केला. उद्धव ठाकरे बरंच काही बडबडले आहेत. त्यात त्यांनी अनेक धमक्या दिल्या. महाराष्ट्र पेटवीन वगैरे वाक्य आहेत त्यांची. पण उद्धव ठाकरे आज स्वतः कोण आहेत, याची जाणीव त्यांना आहे का माहीत नाही. तसं जे म्हणताहेत की प्रकल्प जर उद्या सुरू केला, हुकुमशाही करून सुरू केला तर आम्ही महाराष्ट्र पेटवू असं त्यांचं वाक्य आहे. ४० आमदार गेले. १०-१२ आमदारच असतील आता. महाराष्ट्रात सर्वांत कमी ताकदीचा पक्ष म्हणजे शिवसेना”, असं नारायण राणे म्हणाले.

Chandrashekhar Bawankule,
“अपघाताच्या घटनेवरून राजकारण करणे चुकीचे”, बावनकुळेंनी काँग्रेसचे आरोप फेटाळले; म्हणाले, “महाराष्ट्रात घातपात…”
sanjay raut on yogi adityanath
योगी आदित्यनाथ यांच्या महाराष्ट्र दौऱ्यावरून संजय राऊतांचे टीकास्र; म्हणाले, “योगींनी यूपीतच थांबावं, तिथे…”
Sanjay raut on prakash ambedkar
वंचितने ठाकरे गटाबरोबरची युती तोडली, संजय राऊत म्हणाले; “बाळासाहेब ठाकरे नेहमी सांगायचे…”
raj thackeray devendra fadnavis (1)
फडणवीसांनी मध्यरात्री घेतली राज ठाकरेंची भेट, काय चर्चा झाली? उपमुख्यमंत्री म्हणाले…

हेही वाचा >> “हुकूमशाहीने प्रकल्प लादण्याचा प्रयत्न केला तर महाराष्ट्र पेटवू”, राजापूरमध्ये उद्धव ठाकरेंचा शिंदे सरकारवर घणाघात!

“स्वतःला दिर्घकाळ चालता येत नाही. कोणावर हात वर करू शकत नाहीत. तरीही पेटवूची भाषा का बोलतात हे कळत नाही. शिंदे मुख्यमंत्री झाले तेव्हा तिथले कर्मचारी बोलले की आधीचे मुख्यमंत्री फक्त दोनदा आले. मग पेटवायला कधी फिरणार? हेलिकॉप्टरमध्ये मशाल घेऊन जाणार का ? महाराष्ट्रात एवढे नेते आहेत, प्रकल्पाला विरोध करणारे नेते किती? मी कोकणातला आहे. एनरॉन आला, त्याला विरोध, जैतापूरला विरोध, महामार्गाच्या कामाला विरोध, विमानतळाला विरोध, प्रत्येक विकासाच्या कामाला विरोध शिवसेनेने केला आहे. यांना कोकणाबद्दल आस्था, प्रेम, की द्वेष आहे? कोणताही प्रकल्प अडीच वर्षांत कोकणात आणला नाही. ना खासदार, ना आमदाराने आणला. पाटबंधारे, रस्ते, ब्रिज, पायाभूत सुविधांवर सांगावं की स्पेशल म्हणून आणलं इथे. कोकणाच्या विकासात योगदान काहीच नाही”, असंही ते पुढे म्हणाले.

“१९९९ साली सिंधुदुर्गात दरडोई उत्पन्न ३५ हजार होतं. आज ते २ लाख ३० हजार आहे. हे वाढलं आहे ना त्याला कारण शिवसेना उद्धव ठाकरे नाही. उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंना आणलं, असं कोणीतरी म्हणालं. मी शिवसेनेत आलो तेव्हा तो काय करत होता. हा ९९ नंतर आला”, असा ऐकेरी उल्लेख करत उद्धव ठाकरेंवर टीका केली.

“कोकणचा कॅलिफोर्निया करू म्हणाले. पण कॅलिफोर्नियामध्ये काय आहे ते पहा. कॅलिफोर्नियात १४ रिफायनरी प्रकल्प आहे. तिथे पर्यावर नाही का? मग इथेच विरोध का?” असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

हेही वाचा >> “तीन जिल्ह्यांत कोणी ओळखत नव्हतं, आता गद्दारीची नोंद…”; उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना टोला

उद्धव ठाकरे काय म्हणाले होते?

“लोकांची डोकी फुटली तरी चालतील, कोकणातील लोक भिकारी झाले तरी चालतील. मात्र, रिफायनरी झाली पाहिजे, अशी शिंदे सरकारची भूमिका आहे. मात्र, बारसूमधील लोकांना रिफायनरी नको असेल तर इथे रिफायनरी होता कामा नये, जर हुकूमशाहीने हा प्रकल्प लादण्याचा प्रयत्न केला तर महाराष्ट्र पेटवू”, अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरे यांनी शिंदे सरकारवर केली आहे.