“…तर मंत्री आदित्य ठाकरेंनी राजीनामा द्यावा” ; आमदार नितेश राणेंची मागणी!

“मुंबईकरांनो तुमच्या आयुष्याची काही किंमत राहिलेली नाही”, असंही बोलून दाखवलं आहे.

(संग्रहित प्रातिनिधक छायाचित्र)

वरळी बीबीडी चाळीतील सिलिंडर स्फोटाच्या घटनेवरून आता भाजपा आमदार नितेश राणे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी या घटनेच्या पार्श्वभूमीवर वरळी मतदारसंघाचे आमदार व पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

भाजपा आमदार नितेश राणे म्हणाले, “मुंबईकरांनो तुमच्या आयुष्याची काही किंमत राहिलेली नाही. वरळी बीडीडी चाळीत एक सिलिंडर स्फोट होतो. त्यानंतर संबंधिक कुटुंबाला पालिकेच्या नायर हॉस्पिटलमध्ये भरती केलं जातं. तासंतास त्या कुटुंबला बघायला एकही डॉक्टर येत नाही आणि त्यामुळे चार महिन्याचं बाळ मृत्यूमुखी पडतं. त्यानंतर त्याचे वडील देखीवल मृत्यूमुखी पडतात आणि आज त्याच्या आईला देखील आयुष्य गमावावं लागलेलं आहे. आता मुंबईत दोन विभिन्न चित्र आहेत. एका बाजूला याच मतदार संघाचे आमदार त्यांचे वडील, राज्याचे मुख्यमंत्री आहेत. ते आजारी आहेत आणि त्यांना बरं करण्यासाठी मोठ्यातला मोठा डॉक्टर जगभरातून मुंबईत आणला जात आहे. ते लवकर बरे झाले पाहिजे अशी आमची इच्छा आहे. पण सामान्य मुंबईकरांसाठी अशा पद्धतीचा प्रयत्न का होत नाही? साधा महापालिकेचा डॉक्टर देखील त्यांना बघायला येत नाही आणि या सगळ्याचा जबाबदार उद्या डॉक्टरला धरल्यापेक्षा, संबंधित आमदार आहेत ते मुंबईचे पालकमंत्री आहेत. वर्षानुवर्षे महापालिकेत त्यांची सत्ता आहे. त्यांना जर कारभार करायला जमत नसेल, तर मंत्री आदित्य ठाकरेंनी राजीनामा द्यावा, थोडीही लाज असेल तर. अशी मागणी मी करतो.”

वरळी बीडीडी चाळीतील सिलिंडर स्फोटाच्या घटने लहान बाळ आणि त्याच्या वडिलांच्या पाठोपाठ आता त्या बाळाच्या आईचा देखील मृत्यू झाला आहे. त्यामुळे या कुटुंबातील पाच वर्षीय मुलगा अनाथ झाला. या स्फोटात या कुटुंबातील चौघे जण जखमी झाले होते. त्यांना वेळेत उपचार न मिळाल्याने सर्वात अगोदर लहान बाळाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर त्या बाळाचे वडील आणि त्याची आई देखील दगावल्याने, या कुटुंबातील पाच वर्षीय मुलगा अनाथ झाला आहे. आता यावरून आता भाजपा व शिवसेनेत राजकारण सुरू झाल्याचं दिसत आहे.

या अनाथ झालेल्या मुलाला दत्तक घेण्याची घोषणा मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केली आहे. या बाळाचं पालनपोषण शिवसेना करेल असं महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Then minister aditya thackeray should resign demand of mla nitesh rane msr

ताज्या बातम्या