अंधश्रद्धा व काळी जादू यास शिवसेनेचा आधीपासूनच विरोध आहे. परंतु, जादूटोणा विरोधी कायद्याच्या आडून हिंदुंची श्रद्धा व संस्कृतीवर घाव घातला जाणार असेल तर शासनाचा वटहुकूम हाणून पाडला जाईल, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला. इतर धर्मियांमध्येही मोठय़ा प्रमाणात अंधश्रद्धा आहेत. त्यामुळे जादूटोणा विरोधी कायदा इतर धर्मियांनाही लागू करावा, अशी मागणीही त्यांनी केली.
नाशिक जिल्हा शिवसेनेच्या वतीने रविवारी दादासाहेब गायकवाड सभागृहात आयोजित पदाधिकारी व कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी ठाकरे यांनी शरद पवार, पृथ्वीराज चव्हाण आणि छगन भुजबळ यांच्यासोबत नाशिक महापालिकेची धुरा सांभाळणाऱ्या मनसेवरही चांगलेच तोंडसुख घेतले. जादूटोणाविरोधी कायदा बनविताना केवळ हिंदू धर्माला डोळ्यासमोर ठेवण्यात आले आहे. इतर धर्मियांमध्येही अंधश्रद्धेचे प्रमाण मोठे आहे. यामुळे तो कायदा इतर धर्मानाही लागू करणे आवश्यक असल्याचे ठाकरे यांनी नमूद केले. या मुद्यावरून ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर तोफ डागली. या कायद्याच्या आधारे बाबागिरीला लगाम घातला जाणार आहे. लोकसभा निवडणूक जवळ आल्यामुळे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना तुरुंगात असणाऱ्या अल्पसंख्यांकांपैकी काहींचा कळवळा आला आहे. इशरत जहाँ जर चांगली विद्यार्थिनी होती तर ती अतिरेक्यांसोबत काय करत होती, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. पवारांची वक्तव्ये म्हणजे केवळ पंतप्रधान होण्यासाठी चाललेला आटापिटा असल्याची टीका ठाकरे यांनी केली.
मंडल आयोगाच्या मुद्यावरून छगन भुजबळ शिवसेनेतून बाहेर पडले होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षांनी आर्थिक निकषावर आरक्षण देण्याची भूमिका मांडली आहे. म्हणजेच आरक्षणाच्या मुद्यावर भुजबळ व पवार यांची वेगवेगळी भूमिका आहे. त्यामुळे आता भुजबळ राष्ट्रवादी सोडतील काय, असा प्रश्न उपस्थित करीत ते सत्तेला चिकटून राहतील. लोकसभेच्या निवडणुकीत मोठे भुजबळ असो किंवा छोटे, कोणीही असले तरी त्यांची अनामत जप्त होईल यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहनही त्यांनी केले. नाशिक महापालिकेची सत्ता मिळून दीड वर्षांचा कालावधी लोटला असतानाही मनसेने काहीच केले नाही. शिवसेनेच्या कार्यकाळात बांधलेल्या १६ रस्त्यांवर आजही खड्डे नसल्याचे स्पष्ट करत त्यांनी राज ठाकरे यांना अप्रत्यक्षपणे सुनावले.
चित्रण पाहिल्यानंतर कदम यांच्या राजीनाम्यावर निर्णय
पिंपळगाव बसवंत टोल नाक्यावर महिला कर्मचारी आणि शिवसेनेचे अनिल कदम यांच्यात झालेल्या वादविवादाची परिणती आमदारकीच्या राजीनाम्यात झाली असली तरी संबंधित टोल कंपनीकडील सीसी टीव्ही कॅमेऱ्याचे चित्रण पाहिल्यावर राजीनाम्याबाबत अंतीम निर्णय घेतला जाईल, असे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. यामुळे आमदारकीचा राजीनामा सादर करणाऱ्या कदमांना काहिसा दिलासा मिळाला आहे. कदम यांच्या संयमाचा कडेलोट का झाला, नाक्यावर नेमके काय घडले, कोणी त्यांना अडकविण्यासाठी सापळा रचला काय, याची शहानिशा करून दोषी असेल तर कारवाई अन्यथा कदम यांच्यावर कोणताही अन्याय केला जाणार नसल्याचे ठाकरे यांनी स्पष्ट केले.