scorecardresearch

Premium

या गावात आहेत २१ पुरातन गणेशमूर्ती

हिंदू, बौध्द, जैन अशा विविध धर्मांशी हजारो वर्षांचा ऋणानुबंध असलेल्या तगर म्हणजेच आजच्या तेर गावचा इतिहास थक्क करणारा आहे.

ancient-Ganesha-idols
महाराष्ट्रातील तेर हे कदाचित एकमेव गाव असेल, जेथे २१ पुरातन गणेशमूर्ती अस्तित्वात आहेत. (फोटो- लोकसत्ता टीम)

धाराशिव: हिंदू, बौध्द, जैन अशा विविध धर्मांशी हजारो वर्षांचा ऋणानुबंध असलेल्या तगर म्हणजेच आजच्या तेर गावचा इतिहास थक्क करणारा आहे. या परिसरात शैव, वैष्णव, शाक्य सांप्रदायाचे केवळ अस्तित्वच नाही, तर त्यांचे इथे प्राबल्यही होते. अगदी तसेच गाणपत्य म्हणजेच गणपतीला इश्टदेव मानणारा वर्गही हजारो वर्षांपासून इथे वास्तव्यास होता. त्यामुळेच २१ पुरातन गणेशमूर्ती आजही गतकाळातील समृध्द वारशाचा सप्रमाण पुरावा देत आहे. महाराष्ट्रातील तेर हे कदाचित एकमेव गाव असेल, जेथे २१ पुरातन गणेशमूर्ती अस्तित्वात आहेत.

तेर येथे झालेल्या उत्खननात काही नाणी अशीही आढळून आली आहेत, ज्यावर गणपतीचे अंकन करण्यात आले आहे. याशिवाय विविध प्रकारच्या दगडांमधून निर्माण करण्यात आलेल्या अनेक गणेशमूर्ती तेरच्या उत्खननातून समोर आल्या आहेत. रामलिंगअप्पा लामतुरे शासकीय पुराणवस्तू संग्रहालयात त्या आजही आपल्याला पहावयास मिळतात. आकाराने लहान परंतु कलाकुसरीच्या दृष्टिने अत्यंत आकर्षक असलेल्या या मूर्तींकडे पाहताना प्राचीन काळातील गणेशपूजकांची दृष्टी स्पष्ट होते. पाषाणातून निर्माण केलेली शाईची दाऊत आणि त्यावर कोरलेली गणेशमूर्ती लक्षवेधी अशी आहे.

rashtrasant tukdoji maharaj share experience during a tour in 1949
चिंतनधारा: खरे साधुत्व पंथात नाही!
Businessman Dadasaheb Bhagat Success Story in Marathi
गावात विहिरी खोदल्या, इन्फोसिसमध्ये टॉयलेट केले साफ; आज ऑडी अन् २ कोटींच्या कंपनीचा मालक आहे मराठी तरुण
karad conflict
दंगलीनंतर साताऱ्यात तणाव; एकाचा मृत्यू, दहा जखमी, घरे, दुकानांसह प्रार्थनास्थळाचीही जाळपोळ
Kavad festival akola
राज्यातील सर्वांत मोठ्या कावड महोत्सवाचा जाणून घ्या इतिहास, महत्त्व

आणखी वाचा-रायगड : तडीपारीच्या प्रस्तावांवर तीन वर्षानंतरही निर्णय नाही; गुंड मोकाट…

वरील मूर्तीव्यतिरिक्त या शासकीय वस्तुसंग्रहालयात मोरावर आरूढ असणारा गजानन हातामध्ये कमळकळी, डमरू व त्याचा आवडता मोदक घेवून बसला आहे. उत्तर यादवकालीन मानल्या जाणार्‍या गणेशमूर्तीच्या मस्तकावरील मुकुट, गळ्यातील हार, पायातील तोडे, कंकण, मेखला आणि अंगावरचे यज्ञोपवितही लक्षवेधी पध्दतीने कोरले आहे. मोदकाना सोंडेने स्पर्श करणारा हा गजवदन शहाबादी दगडापासून कोरण्यात आला आहे.

या व्यतिरिक्त तेरमधील विविध मंदिरात विविध काळातील गणनायकाच्या मूर्ती आजही सुस्थितीत आहेत. मेंडेश्वराच्या पाठीमागे असलेले शिल्प, तुंगेश्वर मंदिरातील गणपती, कणकेश्वर महादेवाच्या मागील वरदविनायक, पुरातन नरसिंह मंदिरातील सभामंडपातील लंबोदर गजानन, गौरीचे रूप असणार्‍या तेरमधील अंबिका मंदिरात असलेला विनायक, देवीचे उग्र रूप धारण केलेल्या चामुंडेच्या मंदिरातील गजाननाची सुरेख मूर्ती, सिध्देश्वर मंदिराच्या गाभार्‍यातील द्वार शाखेवर अपवादानेच आढळून येणारी गणेशमूर्ती आणि कालेश्वराच्या शिवालयात सभामंडपात असलेल्या अप्रतिम गणेशमूर्तीचे दर्शन घेताच भाविकांना मोठे समाधान लाभते.

आणखी वाचा-पं.भीमसेन जोशी युवा शिष्यवृत्ती जाहीर; कोण ठरले पात्र व कश्यामुळे वाचा..

पर्यटक आणि भाविकांना आकर्षित करणारी गणेश रूपे

गणपतीच्या नावावरून तेरनगरी गणेश चौक आहे. तेथील गणपतीचे मंदिर पूर्वाभिमुख आहे. मंदिरातील मूर्ती आणि मंदिर दोन्ही भाविकांचे आद्यस्थान आहे. तेरमधील हे सर्वात जुने गणपती मंदिर असावे, असे म्हटले जाते. पुरातन मंदिराच्या काही खुणा, द्वारशाखेचे शिलाखंड आजही इथे पहावयास मिळतात. गणनायकाच्या बाजूला हनुमंत असे अपवादात्मक चित्र तेरमध्ये पहावयास मिळत असल्याची माहिती इतिहास अभ्यासक ह.भ.प. दीपक खरात यांनी दिली आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: There are 21 ancient ganesha idols in ter village mrj

First published on: 22-09-2023 at 17:19 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×