scorecardresearch

संत गाडगेबाबांच्या वंशजांवर अन्याय नाही ; धर्मशाळा ट्रस्टचे स्पष्टीकरण

गाडगेबाबांचे नातू निवृत्ती सोनवणे यांना धर्मशाळेतून हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे त्यांचे म्हणणे होते.

(संग्रहित छायाचित्र)

अमरावती : श्री गाडगे महाराज धर्मशाळा ट्रस्टने संत गाडगेबाबांच्या वंशजांवर कोणत्याही प्रकारचा अन्याय केलेला नाही, असे स्पष्टीकरण धर्मशाळा ट्रस्टने  दिले असून गाडगेबाबांचे वंशजच संस्थेची बदनामी करीत असल्याचा आरोपही केला आहे.

संत गाडगेबाबांच्या पणती सुनीता तऱ्हेकर यांनी संस्थेच्या विश्वस्तांवर आरोप केले होते. गाडगेबाबांचे नातू निवृत्ती सोनवणे यांना धर्मशाळेतून हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे त्यांचे म्हणणे होते.

 ४०-५० वर्षांपूर्वी मूर्तिजापूर येथील गोरक्षण संस्थेत संत गाडगेबाबांचा विरोध असतानाही संस्थेचे प्रमुख विश्वस्त दादासाहेब देशमुख यांनी निवृत्ती सोनवणे यांना राहण्याची खोली दिली, संस्थेचे ६ एकर शेत दिले. अनेक वर्षे ते त्या ठिकाणी राहिले. परंतु त्यांनी स्वतंत्र घर घेण्याचा प्रयत्न केला नाही. त्यावेळी संघर्ष केला असता तर त्यांच्यावर ही वेळ आली नसती, अशी प्रतिक्रिया संस्थेच्या वतीने एकनाथ ठाकूर यांनी  दिली आहे. त्यांच्या कुटुंबाची परिस्थिती पाहता त्यांचे लहान पुत्र राजेंद्र सोनवणे यांना संस्थेचे प्रमुख दादासाहेब देशमुख यांनी धर्मशाळेत कामाला पाठवले. पण त्यांच्यात सेवाभाव नसल्याने ते बाहेर नोकरीला लागले. आता तुम्ही बाहेर जागा पहा, असे विश्वस्तांनी त्यांना सांगितले.  पण, त्यांनी व्यवस्था केली नाही. त्यांच्या  विनंतीवरून त्यांना खोली क्रमांक ५ राहण्यासाठी दिली. संस्थेच्या नियमांच्या विरोधात ते या ठिकाणी व्यवसाय करीत आहेत. मूर्तिजापूर येथील खोली अजूनही निवृत्ती सोनवणे यांच्या ताब्यात आहे. राजेंद्र सोनवणे यांच्याकडून नियमांप्रमाणे शुल्क घेतले जात आहे. पण, गेल्या पाच ते सहा वर्षांपासून त्यांनी शुल्क भरलेले नाही. सुनीता तऱ्हेकर यांनी संस्थेच्या विश्वस्तांवर केलेले आरोप खोटे असल्याचे एकनाथ ठाकूर यांनी स्पष्ट केले आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: There is no injustice on the descendants of saint gadge baba says dharamshala trust zws