शिवराय, शाहू, फुले, आंबेडकर यांच्या महाराष्ट्रात करोनाशी लढण्यासाठी लष्कराची गरज नाही असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. शिवरायांनी आपल्याला लढायचं कसं ते शिकवलं आहे. महाराष्ट्रातला प्रत्येक नागरिक हा त्या जवानासारखाच आहे. इथे मला लष्कर आणायचं नाही. करोनाशी लढा आपण सगळे मिळून देत आहोत. ही लढाई आपण जिंकणारच असाही विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला.

लॉकडाउन म्हणजे गतिरोधक आहेत. आपण करोना विषाणूची गती रोखली आहे. मात्र त्याची साखळी तोडण्यात आपण अजून यशस्वी झालेलो नाही. आपल्याला ही साखळी तोडून हे संकट संपवायचं आहे असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. मी कालच्या बैठकीत फिजिकल डिस्टन्सिंग हा शब्द वापरला. सोशल डिस्टन्सिंग म्हणजे सामाजिक अंतर आपल्याला नको आहे. करोनाबरोबर जगा असं काहीजण म्हणत आहे. म्हणजे कसं जगायचं? असं घरात राहून? ते काही शक्य होणार नाही असंही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.

महाराष्ट्रात आजच्या घडीला २ लाखापर्यंतच्या चाचण्या झाल्या आहेत. त्या कुठेही कमी होणार नाहीत. मात्र कुणीही उठलं आणि टेस्ट करुन आलं असं होणार नाही. काही केसेस अशा आहेत ज्या शेवटच्या टप्प्यात आपल्याकडे येतात. जर कुणाला सर्दी, खोकला, ताप ही लक्षणं आढळली तर आवर्जून फिव्हर क्लिनिकला भेट द्या जेणेकरुन पुढचा उपचार करणं सोपं होईल. आजच्या घडीला १८ हजाराच्या पुढे करोना रुग्णांची संख्या गेली. मात्र सुमारे सव्वा तीन हजार लोक उपचारानंतर घरीही गेले आहेत. त्यामुळे प्रयत्न सगळे सुरु आहेत.

पोलीस आणि डॉक्टर यांच्या रुपात देव आपल्यासोबत आहेत हे मी वारंवार सांगतोय तसंच मी डॉक्टरांनाही सांगतो आहे की कोणताही गलथान कारभार सहन करणार नाही. दिरंगाईला क्षमा नाही. सगळं चांगलं असताना आम्हाला कारवाई करण्याची वेळ आणू नका असंही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं. कोविड योद्धा या मोहिमेला चांगला प्रतिसाद आहे. आम्हाला आयुषच्या डॉक्टरांचीही गरज आहे त्यांनाही मी विनंती केली आहे. आयुर्वेदिक आणि होमिओपॅथी या डॉक्टरांनाही मी मदतीसाठी पुढे या असं आवाहन केलं आहे. कोणीही मेहनतीत मागे पडलेलं नाही. या सगळ्यांच्या साथीने लढाई सुरु आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं.