देशातील कर्जत हे एकमेव तालुक्याचे ठिकाण आहे की जिथे आजही रोज ३७ हजार नागरिक पिण्याचे पाणी रतीब लावून विकत घेतात. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर अनेक पिढयांचा हा प्रलंबित प्रश्न सुटेल असे वाटत असतानाच महाराष्ट्र जीवन प्राधिकारण या विभागाने मात्र कर्जत ग्रामपंचायतीचे रूपांतर नगर परिषदेमध्ये झाले आहे व  प्रस्तावित पाणी योजना ही फक्त ग्रामीण भागासाठी व ग्रामपंचायत स्तरासाठी असल्याने यामध्ये आता कर्जत गाव येत नसल्याने आपणास या योजनेमधून वगळण्यात आले आहे असे ११ सप्टेंबर रोजी ग्रामपंचायतीला पाठवलेल्या पत्रामध्ये म्हटले आहे. यामुळे कर्जतकरांच्या पिण्याच्या पाण्याची समस्या सध्या तरी सुटणार नाही असे दिसत आहे.
 जीवन प्राधिकरण विभागाच्या कार्यकारी अभियंता यांनी पाठवलेल्या या पत्रामध्ये पुढे म्हटले आहे कि, कर्जत ग्रामपंचायतीचे रूपांतर आता नगरपालिकेमध्ये करण्यात आले आहे. राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना ही  फक्त ग्रामीण भागासाठी मर्यादित आहे. यामध्ये केवळ ग्रामीण भागामधील गावें, वाडया, वस्त्या, याचां समावेश होतो. ही योजना नागरी क्षेत्र किंवा नगरपंचायत क्षेत्र घोषित झालेल्या क्षेत्राचा समावेश असल्याने निधी देता येत नाही.व तसा निर्णय राज्य सरकारच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाने घेतला आहे. त्यामुळे कर्जत श हरासाठी मंजूर केलेली खेड येथून नवीन जलवाहिनी, फिल्टरटँक व अतंर्गत जलवाहिनी हा सर्व प्रकल्प रध्द झालेला आहे.
कर्जत शहराचा पिण्याच्या पाण्याची समस्या फार गंभीर आहे. येथे नळावाटे येणारे पाणी चार ते पाच दिवंसा नंतर येते. येणारे पाणी हे थेट थेरवडी तलावामधील असते त्याला शुध्दीकरण टँक नाही त्यामुळे ते पिण्यास आयोग्य आहे याशिवाय शहरामध्ये अंतर्गत असलेली जलवाहिनी देखील अनेक ठिकाणी गळती लागलेली आहे त्यामुळे त्याव्दारे अशुध्द व घाण पाणी परत त्या जलवाहिनीमधून येते व ते नागरिकांना नळावाटे पुरवले जाते. हे सर्व प्रकार पाहून अनेक जण नळावाटे आलेले पाणी हे केवळ दैनंदिन गरज भागवण्यासाठीच वापरतात आहे व पिण्यासाठी शुद्ध पाण्याचे रतीब नागरिकांनी लावले आहेत व असे रोज पाणी विकत घेवून वापरले जात आहे.