महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या निमित्ताने शिवतीर्थावर सभा घेतली. या सभेला अभूतपूर्व गर्दी झाली होती. आपल्या भाषणात राज ठाकरेंनी शिवसेनेची जी काही अवस्था झाली ती पाहून वाईट वाटलं, वेदना झाल्या असं म्हटलं. मला उद्धव ठाकरेंच्या राजकारणाशी काहीही घेणंदेणं नाही. मात्र आज ही परिस्थिती त्याच्यावर का आली त्यासाठी मी तुम्हाला काही गोष्टी सांगतो आहे असं राज ठाकरे म्हणले. तसंच महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष काढेन असा विचारही मी बाहेर पडताना केला नव्हता असंही त्यांनी म्हटलं. मी शिवसेना सोडल्यानंतर माझ्याबाबत अपप्रचार करण्यात आला त्यामुळे मी हे प्रसंग सांगतोय असंही राज ठाकरे म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय म्हणाले राज ठाकरे?

“मी शिवसेना सोडल्यानंतर माझ्याविषयी अपप्रचार केला गेला. त्यामुळे मला काही गोष्टी सांगाव्या लागत आहेत. मी एकेदिवशी उद्धवसोबत हॉटेल ओबेरॉयला गेलो. तिथे मी त्याला बसवलं. मी हे जे सांगतोय ते शिवछत्रपतींची शपथ घेऊन सांगतो आहे. मी उद्धवला बसवलं आणि विचारलं की तुला काय हवं आहे? तुला पक्षाचा प्रमुख व्हायचं आहे? हो. तुला मुख्यमंत्री व्हायचं आहे सत्ता आल्यावर हो. मला फक्त सांग की माझं काम काय? मला फक्त प्रचाराला बाहेर काढू नकोस. कारण मी प्रचाराला बाहेर पडतो आणि नंतर दिसत नाही. लोकांना मला तोंड दाखवला येत नाही. मला सांग की मी नेमकं काय करायचं आहे? मला उद्धव म्हणाला की मला काहीही प्रश्न नाही. मी विचारलं ठरलं ना? तो म्हणाला हो ठरलं.

उद्धव आणि मी बाळासाहेबांकडे आलो तेव्हा..

यानंतर ओबेरॉय हॉटेलमधून मी आणि उद्धव मातोश्रीवर आलो. बाळासाहेब ठाकरे झोपले होते. मी त्यांना उठवलं त्यांना सांगितलं की सगळा प्रॉब्लेम मी सोडवला. आमच्या दोघांमध्ये आता काही वाद नाहीत. बाळासाहेब ठाकरेंनी मला मिठी मारली आणि म्हणाले खरंच वाद मिटवलेस मी म्हटलं होय खरंच वाद मिटवले. ते मला लगेच म्हणाले उद्धवला बोलव. मी कुणाला तरी निरोप दिला उद्धवला बोलवा बाळासाहेबांनी बोलावलं आहे. पाच मिनिटं तो आला नाही. बाळासाहेबांनी मला सांगितलं अरे उद्धवला बोलव. मी त्याला बोलावयाला गेलो तो तिथून निघून गेला होता. मला कारण नसताना त्रास दिला जात होता. मी बाहेर कसा पडेन यासाठी या सगळ्या गोष्टी केल्या गेल्या.

मी शिवसेनेतून बाहेर पडल्यावर ठरवून माझा अपप्रचार केला गेला

मी उद्धव आणि त्याच्यासोबतच्या लोकांना कंटाळून शिवसेना सोडली. त्यानंतर माझ्याविषयी अपप्रचार केला गेला.  जेव्हा शिवसेना या पक्षातून बाहेर पडलो आणि त्या पक्षातून बाहेर पडल्यानंतर मी इथे जेव्हा भाषण केलं होतं तेव्हा मी म्हटलं होतं की माझा वाद माझ्या विठ्ठलाशी नाही तर आजूबाजूच्या बडव्यांशी आहे. मी तेव्हा हेदेखील म्हटलं होतं की हीच चार टाळकी हा पक्ष खड्ड्यात घालणार. खड्ड्यात पक्ष घातल्यानंतर त्याचा वाटेकरी व्हायची माझी इच्छा नाही म्हणून मी पक्ष सोडतोय. आजची ही परिस्थिती पाहिल्यावर टेलिव्हिजन सीरिज असतात त्यात रिकॅप येतो. २००६ मध्ये जेव्हा मी पक्ष स्थापन केला तेव्हा तो याच शिवतीर्थावर केला. मात्र त्या भाषणात काय झालं कशामुळे झालं तो चिखल करायचा नव्हता आजही करायाचा नाही. मात्र काही गोष्टी पसरवल्या गेल्या. राज ठाकरेला शिवसेनापक्षप्रमुख पद हवं होतं. राजला शिवसेना मिळाली नाही म्हणून त्याने पक्ष सोडला. मी तुम्हाला खरंच सांगतोय मी कधी स्वप्नातही पक्षप्रमुख होणयाचा विचार केला नव्हता. मात्र मी पक्ष सोडल्यावर माझ्याविरोधात अपप्रचार केला गेला असं म्हणत राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवर टीकेची तोफ डागली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: There was a rumor then when i left the shivsena party because i wanted the post of shiv sena chief said raj thackeray scj
First published on: 22-03-2023 at 21:39 IST