स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आलेल्या असताना राज्यात ओबीसी आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. मध्यप्रदेशच्या धर्तीवर राज्यातही ओबीसी आरक्षण लागू करून घ्यावे अशी मागणी भाजपकडून केली जात आहे. भाजपने याच मागणीला घेऊन बुधवारी मंत्रालयावर मोर्चा काढला. असे असताना आता राज्याचे उपमुख्यंत्री अजित पवार यांनी ओबीसी आरक्षणावर महत्त्वाचे भाष्य केले आहे. ओबीसी समाजाला कशा प्रकारे न्याय देता येईल, याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या विषयावर चर्चा होऊ शकते, असे अजित पवार म्हणाले आहेत.

हेही वाचा >> “…एवढीच माफक अपेक्षा”, अनिल परबांच्या घरावरील ईडीच्या धाडीनंतर अजित पवारांची प्रतिक्रिया!

“राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी विभागाच्या राज्यस्तरीय अधिवेशनात शरद पवार यांनी काल मार्गदर्शन केले. ओबीसी समाजाला कसा न्याय देता येईल त्यासाठी आमचा प्रयत्न सुरु आहे. आज मंत्रिमंडळाच्या बैठकीतही त्यावर चर्चा होईल. शेवटी महत्त्वाचे जे प्रश्न असतात त्याची चर्चा कॅबिनेटमध्ये तिन्ही पक्ष एकत्र येऊन करतात. इतर पक्षांचाही यामध्ये समावेश असतो,” असे अजित पवार म्हणाले.

हेही वाचा >> “वहिनी कान्सला जातील आणि…”; सुप्रिया सुळेंना स्वयंपाक करण्याचा सल्ला देणाऱ्या चंद्रकांत पाटलांना महिला आणि बालविकास मंत्र्यांचा टोला

दरम्यान, ओबीसींना न्याय्य हक्क मिळण्यासाठी देशात त्यांची संख्या किती आहे. त्यांची अवस्था काय आहे? हे समजणे गरजेचे आहे. त्यामुळे जातीनिहाय जनगणना करणे गरजेचे आहे, असे मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले आहे. तर दुसरीकडे दिल्ली जा किंवा काहीही करा पण ओबीसींना आरक्षण द्या, अशी आक्रमक मागणी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. असे असताना आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक होत आहे. या बैठकीत ओबसींच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा होण्याची शक्यता अजित पवार यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे आजच्या बैठकीत नेमकं काय होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे