Narayan Surve: वंचित आणि कष्टकरी वर्गाच्या व्यथांना शब्द देणारे थोर साहित्यिक आणि कवी नारायण सुर्वे यांच्या अनेक कवितांवर एक पिढी घडली आहे. याच नारायण सुर्वे यांच्या घरी एका चोराने चोरी केली. मात्र त्या चोराला जेव्हा समजलं की हे त्यांचं घर आहे तेव्हा मात्र त्याने चोरलेली वस्तू परत केली. तसंच एक चिठ्ठीही लिहिली आणि त्यात त्यांनी सुर्वे आणि त्यांचे कुटुंबीय यांची माफीही मागितली. हा प्रसंग पाहण्यासाठी आज नारायण सुर्वे हयात नाहीत, मात्र या घटनेची चर्चा होते आहे. नेमकं काय घडलं? रविवारी दिवंगत कवी नारायण सुर्वे यांची मुलगी सुजाता घारे आणि त्यांचे पती गणेश घारे हे नेरळ येथून विरारला गेले होते. नारायण सुर्वे ज्या घरात राहायचे त्या घरात आता त्यांची मुलगी आणि जावई राहतात. घारे दाम्पत्याचा मुलगा विरारला असतो. त्यामुळे ते तिकडे गेले होते. १४ जुलैच्या दिवशी त्यांना त्यांच्या शेजाऱ्यांचा फोन आला. त्यांना हे सांगण्यात आलं की तुमच्या घराच्या बाथरुमच्या काचा फुटलेल्या दिसत आहेत. बहुदा चोराने चोरी केली असावी. यानंतर या दोघांनी घरी येऊन पाहिलं तर घरातून अनेक गोष्टी गायब होत्या. नारायण सुर्वेंच्या कन्या सुजाता घारे काय म्हणाल्या? याबाबत सुजाता घारे म्हणाल्या, "आमच्या घरात बाबांचा (नारायण सुर्वे) मोठा फोटो लावला आहे. आम्हाला त्या फोटोजवळ एक चिठ्ठी सापडली. त्यात लिहिलं होतं मला माहीत नव्हतं की हे नारायण सुर्वेंचं घर आहे. जर माहीत असतं तर मी या घरात कधीच चोरी केली नसती. मी तुमच्या घरातून चोरलेल्या वस्तू परत करत आहे. मला माफ करा." अशी माहिती सुजाता घारे यांनी इंडियन एक्स्प्रेसला दिली. सुजाता घारे पुढे म्हणाल्या, "चोरी झालेला टीव्ही चोराने परत केला आहे. मात्र इतर काही गोष्टी गायब आहेत. टेबल फॅन, तेलाच्या न फोडलेल्या पिशव्या तसंच इतर काही गोष्टी सापडलेल्या नाहीत. त्यामुळे आम्ही सरळ नेरळ येथील पोलीस ठाणे गाठलं." हे पण वाचा- नारायण सुर्वे यांच्या संकल्पनेतील ‘माझे विद्यापीठ’ साकारण्यात अडथळे नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी ढवळे काय म्हणाले? पोलीस निरीक्षक शिवाजी ढवळे म्हणाले आम्ही या प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे. तसंच सीसीटीव्ही फुटेज आणि जे ठसे नारायण सुर्वेंच्या घरात सापडले त्या आधारे आम्ही चोराचा शोध घेत आहोत. आम्हाला आशा आहे की लवकरच आम्ही त्या चोराचा छडा लावू शकू. तसंच ज्या वस्तू नाहीत त्या मिळतील. पोलिसांचं हे म्हणणं आहे की ज्या चोराने वस्तू चोरल्या तो दोनवेळा या घरात आला असावा. कारण नारायण सुर्वे यांचं हे घर आहे हे चोराला दुसऱ्यांदा त्यांचा मोठा फोटो पाहिल्यावर समजलं असावं. कवी नारायण सुर्वे यांनी आजवर त्यांच्या कवितांमधून वंचित आणि पीडितांची दुःखं मांडली आहेत. २०१० मध्ये त्यांचं निधन झालं. सारस्वतांनो थोडासा गुन्हा करणार आहे..ही नारायण सुर्वेंची कविता खूप गाजली नारायण सुर्वे यांचा जन्म मुंबईत झाला होता. नारायण सुर्वे हे मराठी साहित्यातले लोकप्रिय कवी होते. एक अनाथ म्हणून ते वाढले. त्यांनी हॉटेलमध्ये वेटरचंही काम केलं. तसंच दूध पोहचवणं, हमाली करणं, मिलमध्ये कामाला हातभार लावणं ही सगळी कामं त्यांनी केली. ज्या वंचितांबद्दल त्यांनी लिहिलं त्यांची सगळी दुःखं त्यांनी अनुभवली होती. त्यांच्या 'भाकरीचा चंद्र' या कवितेत त्यांच्या प्रतिभेची साक्ष पटते. तसंच 'कामगार आहे मी तळपती तलवार आहे, सारस्वतांनो थोडासा गुन्हा करणार आहे' असं म्हणत नारायण सुर्वेंनी प्रस्थापितांनाच जणू आव्हान दिलं होतं. याच नारायण सुर्वेंची चर्चा पुन्हा एकदा घडते आहे. कारण त्यांचा फोटो पाहून चोराने वस्तू परत केली आणि माफीही मागितली आहे.