“दिल्लीवरून महाविकासाघाडी सरकारला विविध गोष्टींवरून रोज त्रास दिला जातोय.” असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज(गुरूवार) विधान केलं आहे. सोलापुरमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी शरद पवार यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला. शिवाय, आयकर विभागाच्या छापेमारीवरून देखील शरद पवारांनी यावेळी टीका केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शरद पवार म्हणाले, “मला दिल्लीमध्ये एका सत्ताधारी पक्षाच्या नेत्याने सांगितलं की, तुमचे सगळ्यांशी संबंध चांगले आहेत. पण त्या दिवशी तुम्ही जालियनवाला हत्याकांडाचा उल्लेख केला, ते काही रूजलं नाही आणि म्हणून तुमच्याकडे पाहुणाचार झाला. लोकशाहीमध्ये एखाद्या प्रश्नावर मत मांडायचा अधिकार आहे की नाही? आणि लोकशाहीत मत माडलं म्हणून तुम्ही घरांवर अशा पद्धतीने आणि ते देखील कुणाच्या बाया-बापड्याच्या, मुलींच्या ज्यांचा संबंध नाही. त्यांच्या घरावर तुम्ही छापे मारणार असाल, तर ठीक आहे तुम्ही मारा.. त्याची चिंता नाही. पण, हा शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, जिजामातेचा महाराष्ट्र आहे. सावित्राबाईंचा महाराष्ट्र आहे. आहिल्याबाईंचा महाराष्ट्र आहे. इथे आमची भगिनी कधीही लाचार होणार नाही. तुम्ही छापा मारा नाहीतर काही वाटेल ते करा पण आपलं मत कधी सोडणार नाही. सामान्य माणसांची बांधिलकी कदापी सोडणार नाही, या निष्कर्षाशी आपण सगळेजण आहोत.”

तसेच, “आज या ठिकाणी सरकार सुरू आहे, हे आघाडीचं सरकार आहे. सगळ्यांना घेऊन चालेलं आहे. आघाडीचं सरकार असून देखील कुणी काहीही म्हटलं तरी अत्यंत समंजसपणाने काम करत आहे. लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. अतिवृष्टी झाली पहिला हप्ता देण्यासाठी ३६० कोटी रुपये काल दिलेत, आणखी दिले जाणार आहेत. शेतकऱ्याला संकटातून बाहेर काढायचं आहे. त्याच्या भल्यासाठी सरकार आहे, ही भूमिका असताना दिल्लीवरून या सरकारला अनेक गोष्टींवरून रोज त्रास दिला जातोय.”

याचबरोबर, “ मी आवाहन करतो की, महाराष्ट्रातील सर्व पक्षांनी मिळून शेतकऱ्यांची हत्या करणाऱ्या भाजपा सरकारचा निषेध केला पाहिजे. ११ ऑक्टोबर रोजी या घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंद पुकारला आहे. हा बंद आपण यशस्वी केला पाहिजे. असे आवाहन देखील शरद पवारांनी यावेळी केले. ”

लखीमपूर खेरी घटनेवरून शरद पवारांचं केंद्रावर टीकास्त्र, म्हणाले, “शेतकऱ्यांची हत्या करण्याचं पाप…!”

“ ज्यांच्या हातात देशाची सत्ता आहे, त्यांना शेतकऱ्यांबद्दल आस्था नाही. लखीमपुर खीरी इथे आठ लोक मारले गेले. तुमच्या हातात सत्ता दिली ती लोकांचे भले करण्यासाठी,मात्र याचे विस्मरण भाजपाला पडले आहे. त्यामुळेच शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घालण्याचे पाप भाजपने केले. याबद्दल देशभरात संताप आहे. भाजपाची आर्थिक नीती महागाईला निमंत्रण देणारी आहे. अशा राज्यकर्त्यांविरोधात जनमानस निर्माण करण्याचे काम विरोधी पक्षाला करावे लागणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता सामान्य लोकांच्या हितासाठी वेळप्रसंगी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही याची खात्री मला आहे. ” असंही यावेळी शरद पवार म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: This government is being harassed every day from delhi sharad pawars big statement msr
First published on: 08-10-2021 at 15:38 IST